औरंगाबाद : आॅटोरिक्षा आणि अॅपेरिक्षांवर कडक कारवाई सुरू केलेली असतानाच शहर वाहतूक शाखेने आज सोमवारी शहरात विनाकागदपत्रे वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३७ ट्रॅक्टर जप्त करून पोलीस आयुक्तालयामागील मैदानावर उभे करण्यात आले आहेत. शहरातील बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी जीप, सहा आसनी टमटम यांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. त्यानंतर रस्त्यांवर उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या लक्झरी बसेसला जालना रोडसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय त्यांच्याकरिता शहानूरमियाँ दर्गा परिसरात एक थांबा देऊन बीड बायपासवरून संग्रामनगर उड्डाणपूल मार्ग देण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर पुंडलिकनगर रोडवरील गजानन महाराज मंदिर चौकातील रस्त्यावरील भाजीमंडई हटविली, शहागंजमधील अनधिकृत टेम्पोची पार्किंग काढून रस्ता मोकळा केला. पंधरा दिवसांपासून अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईने ग्रामीण भागाचा परवाना असताना शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपेरिक्षा आणि आॅटोरिक्षांवर जप्तीची कारवाई केली. आजपर्यंत सुमारे ३ हजार रिक्षा जप्त करण्यात आलेल्या आहेत. या कारवाईमुळे बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनेकांनी कारवाईच्या भीतीने आपल्या रिक्षा घरांसमोर उभ्या करून ठेवल्या आहेत. ही कारवाई सुरू असतानाच शहर वाहतूक शाखेने सोमवारी विनाकागदपत्रे वाळू, खडीची वाहतूक करणाऱ्या ३७ ट्रॅक्टरवर कारवाई केली. याविषयी माहिती देताना सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती म्हणाले की, हे ट्रॅक्टरचालक जवळ कोणतेही कागदपत्रे बाळगत नाहीत. शिवाय अनेकांकडे लायसन्सही नसते. शिवाय रस्त्यावर खडी, वाळू टाक तात. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी ३७ ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वाळूचे ३७ ट्रॅक्टर पोलिसांनी केले जप्त
By admin | Updated: June 2, 2015 00:30 IST