तालुक्यातील जवळपास ३० हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात नुकसानीपोटी ३३ कोटी ९१ लाख ४१ हजार २०० रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात शिल्लक असलेल्या तालुक्यातील चार महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे.
प्रशासनाने तालुक्यात पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी ६६ कोटी रुपयांची मागणी वरिष्ठ पातळीवर केली होती. त्यामुळे शंभर टक्के निधी प्राप्त झाला असून, लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले. अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे तालुक्यातील एकूण ६६ हजार १९० हेक्टर क्षेत्रावरील पिके जमीनदोस्त झाल्याचे समोर आले होते. तालुक्यातील महालगाव, वैजापूर, गारज, नागमठाण, बोरसर, लाडगाव, अशा एकूण सहा महसूल मंडळांतील ५१ गावांतील २३,३४९.९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. पहिल्या टप्प्यातील बाधित शेतकरी संख्या २९ हजार ५५४ होती. तालुक्यातील चार महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील ३३ कोटी ७६ लाख ८५ हजार २०० रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. तालुक्यात एकूण दहा महसूल मंडळांपैकी चार महसूल मंडळांतील शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित होते. दुसऱ्या टप्प्यात निधी प्राप्त झाला खरा, मात्र या महसूल मंडळातील गावांसह शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या तयार करण्याचे काम महसूल पातळीवर सुरू आहे.
कोट
दुसऱ्या टप्प्यात आता ३३ कोटी ७६ लाख ८५ हजार ९०० रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मागणीनुसार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के निधी प्राप्त झाला असून, दुसऱ्या टप्प्यातील निधी लवकरच शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल.
-राहुल गायकवाड, तहसीलदार, वैजापूर