नांदेड: मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ३०़३४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला असून प्रकल्पाची पाणीपातळी ३५०़९५ मीटरपर्यंत वाढली आहे़ सद्य:स्थितीत प्रकल्पात एकूण ३७़५५ टक्के पाणी जमा झाले आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात मागील आठवड्यात ८़८३ दलघमी पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरावर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले होते़ परंतु पोळ्यानंतर सुरू झालेल्या पावसामुळे हे संकट काही प्रमाणात टळले आहे़ मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळाचे सावट होते़ जिल्ह्यातील लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पातील पाणीपातळी घटली होती़ विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीसाठी संपत चालल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर प्रश्न निर्माण झाला होता़ अवघे ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी विष्णूपुरीत असल्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ ऐन पावसाळ्यात ही स्थिती निर्माण झाल्याने पुढील काळातील नियोजनासाठी प्रशासन सरसावले होते़ मात्र पोळ्यानंतर सलग सहाव्या दिवशीही पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला़ तर नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या संकटातून काही प्रमाणात मुक्त केले़ आशिया खंडातील सर्वात मोठी सिंचन योजना असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात पावसाळ्यात प्रथमच चिंताजनक परिस्थिती ओढवली होती़ या प्रकल्पात ४० किलोमीटर लांब गोदावरी नदीत पाणी जमा होते़ प्रकल्पाची क्षमता ८०़७९ दलघमी आहे़ उन्हाळ्यात या प्रकल्पाची पाणीपातळी खालावत जावून जून, जुलै महिन्यात हा साठा १० दलघमीवर येवून ठेपला होता़ दिग्रस बंधाऱ्यातून घेतलेल्या ९ दलघमी पाण्यावर जुलै व आॅगस्ट महिन्याची तहान भागली़ पुढील पाण्याच्या नियोजनात मनपा प्रशासन गुंतले असतानाच या आठवड्यात झालेल्या पावसाने प्रकल्पाची पाणी पातळी उंचावली़ शनिवारी दुपारपर्यंत प्रकल्पात ३०़३४ दलघमी पाणी जमा झाले़ पूर्णा प्रकल्प क्षेत्रात होत असलेल्या पावसाने विष्णूपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा सुरू झाला आहे़ त्यामुळे पुढील पाच महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे संकट टळले आहे़ प्रशासनाच्या सूचनेनुसार प्रकल्पातील पाणी हे पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे़ पाण्याची चोरी रोखण्यासाठी यापूर्वीच दक्षता पथक नियुक्त केले आहे़ येत्या महिन्याभरात आणखी दमदार पाऊस झाल्यास प्रकल्पाच्या टक्केवारीत भर पडणार आहे़ असे असले तरी उपलब्ध पाण्याची बचत करण्याची गरज असल्याचे आवाहन मनपाने केले आहे़ (प्रतिनिधी)
प्रकल्पात ३०़३४ दलघमी पाणी
By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST