उस्मानाबाद : विधानसभेच्या अनुषगांने जिल्ह्यात राजकीय घडामोंडीना वेग आला असून, प्रशासनानेही तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी लागणारे मतदान यंत्रे उत्तर प्रदेशाततून मागविण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात २ हजार ७०० मतदान यंत्रे व २ हजार २०० कंट्रोल युनिट प्राप्त झाल्याची माहिती भूम उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांनी दिली. दरम्यान, प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या मतदार यादी पुनरिक्षण अभियानात जिल्ह्यात नव्याने २४ हजार २९ मतदार वाढले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. ‘मतदार मदत केंद्र’ या उपक्रमाव्दारे मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र गोळा करण्याचे काम करण्यात आले असून, १ जानेवारी २०१४ अधारित संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात २० हजार ९९१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ही ११ लाख ६० हजार ९५ एवढी आहे. यात ६ लाख ३७ हजार ६२० पुरुष तर ५ लाख ४३ हजार ४५८ महिला मतदार आहेत. यात उमरगा विधानसभा मतदार संघात २ लाख ७२ हजार ४७७, तुळजापूर ३ लाख १६ हजार २६०, उस्मानाबाद ३ लाख ९ हजार ६४४, परंडा विधानसभा मतदाराची संख्याही २ लाख ८२ हजार ७०५ एवढी आहे.सध्या सुरू असलेली मतदार नोंदणी ही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत १३ हजार ४२८ पुरुष तर १० हजार ६०१ स्त्री मतदार असे एकूण २४ हजार २० नवीन मतदारांची ३० जून २०१४ अखेर नोंदणी झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान मशीन उत्तरप्रदेशातून आले असून, ते आणण्यासाठी भूम उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, भूम तहसीलदार, वाशीचे नायब तहसीलदार वाघमारे, कळंबचे नायब तहसीलदार शिंदे, चार पोलिस कर्मचारी, अव्वल कारकून सचिन पाटील आदी गेले होते. (प्रतिनिधी)
२७०० यंत्रे दाखल
By admin | Updated: August 12, 2014 01:57 IST