औरंगाबाद : झालर क्षेत्रातील २६ गावांसाठी विकास आराखडा एक महिन्यात मंजूर करण्यात येईल, या घोषणेला वर्ष उलटून गेले तरी अद्याप हा आराखडा कागदावरच असल्याचे दिसते. सातारा आणि देवळाई ही झालर क्षेत्रातून वगळून त्याचा समावेश औरंगाबाद महापालिका क्षेत्रात करण्यात आला आहे. उर्वरित २६ गावांसाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत एक महिन्याच्या आत झालर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याची घोषणाही झाली. मात्र, त्यानंतरच्या वर्षभरातही तो तयार झालेला नाही. केवळ नागरिकांचे आक्षेप घेण्याचे काम वर्षभराच्या काळात झाले आहे. दरम्यानच्या काळात सिडकोने झालर क्षेत्रासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या कामातून माघार घेतली आहे. शहरालगतच्या परिसराचा सध्या अनियंत्रित पद्धतीने विकास सुरूआहे. सातारा-देवळाई ही त्याची दोन प्रमुख उदाहरणे आहेत. या भागातील शेकडो बेकायदा घरांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. बाळापूर, सुंदरवाडी, सावंगी, पिसादेवी परिसरात सध्या अनियंंित्रतपणे निवासी संकुलांची उभारणी सुरू असल्याचे दिसते. भविष्य काळात या भागातील वाहतूक, ड्रेनेज, रस्ते, मैदाने आदी प्रश्न निर्माण होण्याची भीती क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सातारा आणि देवळाईचा भाग राजकीय सोयीसाठी राज्य सरकारने महापालिकेत समाविष्ट केला. मात्र, झालर क्षेत्राचा आराखडा तयार करण्याबाबत वेग येत नसल्याचे दिसते. मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने या मुद्याला चालना मिळावी, अशी अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या ‘क्रेडाई’कडून व्यक्त होत आहे.
२६ गावांचा आराखडा अजूनही कागदावरच
By admin | Updated: October 4, 2016 00:52 IST