कळमनुरी : तालुक्यातील २५ गावांत पोळा पोलीस बंदोबस्ताविना साजरा होणार असून तसा ठराव या गावातील ग्रामसभेत घेण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी दिली.तालुक्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम २००७ पासून राबविल्या जात आहे. पोळा पोलीस बंदोबस्ताविना साजरा करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सोडेगाव, सालेगाव, शेनोडी, घोळवा, नवखा आदी गावांत पोळा पोलीस बंदोबस्ताविना साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तंटामुक्ती समित्यांचे काम या गावात चांगले आहे. तंटामुक्त समित्याच्या पुढाकाराने यापुढेही पोलीस बंदोबस्ताविनाच सर्व सण, उत्सव, साजरे केले जाणार आहेत. ‘एक गाव एक गणपती’ साठीही तंटामुक्त समित्यांची बैठक बोलावून त्यांना एकच गणेशमुर्ती स्थापन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. गाव तंटामुक्तीत सातत्य राहिले पाहिजे, यासाठी सर्व तंटामुक्त समित्या प्रयत्न करीत आहेत. पोळा हा सण पोलीस बंदोबस्ताविना साजरा करण्याचा निर्णय २५ गावांतील ग्रामसभेत घेण्यात आला. आमच्या गावात पोळा या सणाला पोलीस बंदोबस्त पाठवू नका, असे लेखी पत्रही २५ ग्रा.पं.नी पोलीस ठाण्याला दिले आहे. (वार्ताहर)
२५ गावांत होणार बंदोबस्ताविना पोळा
By admin | Updated: August 24, 2014 01:11 IST