जालना : घनसावंगी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीअंतर्गत ४३ गावांमध्ये २०१२-१३ मध्ये केलेल्या पांदण रस्त्यांच्या खडीकरणाची देयके शासनाकडून अद्याप अदा न झाल्याने नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. मात्र राजकीय मंडळींच्या मध्यस्थीने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले.१५ मे ते १५ जून २०१४ या कालावधीत शासनाने महात्मा गांधी नरेगा अंतर्गत २०१३-१४ व त्यापूर्वीची प्रलंबित मजुरी व देयके अदा करण्यासाठी विशेष मोहीम राबविली. मात्र या मोहिमेत घनसावंगी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ४३ गावांमध्ये झालेल्या पांदण रस्त्यांच्या खडीकरणाची २ कोटी ३७ लाख रुपयांची देयके अदा झाली नाहीत.त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणार्थींमध्ये सुंदर काळे (लिंबोनी), श्रीरंग गुजर (अरगडे गव्हाण), पंढरीनाथ साबळे (कोठाळा), एकनाथ काळे (लिंबोनी), रामेश्वर चव्हाण (शिंदे वडगाव), पंढरीनाथ काळे, विठ्ठल नाईक (पाडोळी), किशोर जाधव (खडका) आणि मदन जाधव (खडका) यांचा सहभाग होता. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या अॅड. कीर्ती उढाण, सेना उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, जि.प. सदस्य श्यामराव उढाण, भाऊसाहेब घुगे यांनी सायंकाळी ५ वाजता उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी मध्यस्थी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांना उपोषणकर्त्यांची मागणी मान्य करण्याची मागणी केली. याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणार्थींनी मान्यवरांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण मागे घेतले. (प्रतिनिधी)देयके अदा करणारशासनाच्या आदेशानुसार सदरील गावांमधील पांदण रस्त्याच्या खडीकरणाची देयके लवकरच अदा केली जातील, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी दिल्याचे उपोषणार्थींमधून सांगण्यात आले.
४३ पांदण रस्त्यांची २.३७ कोटींची देयके अडकली
By admin | Updated: June 24, 2014 00:13 IST