उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठही नगर पालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आरखडा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आला आहे. सदरील आरखड्यावर आक्षेप नोंदविण्यास ५ ते १४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत सुमारे २२ आक्षेप दाखल झाले आहेत. त्यामुळे आता सुनावणीदरम्यान यातील किती आक्षेप टिकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.नगर परिषदांची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनही युद्धपातळीवर तयारी हाती घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच वॉर्डनिहाय आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार उस्मानाबाद पालिकेअंतर्गत आता आठ ऐवजी १९ प्रभाग झाले आहेत. तर नगरसेवकांची संख्याही ३३ वरून ३९ वर जावून ठेपलुी आहे. दरम्यान, नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमुळे पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. असे असतानाच आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांचे हक्काचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत. त्यामुळे प्रस्थापितांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. या मंडळीकडून आता सुरक्षित वॉर्डचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर आक्षेप घेण्यासाठी ५ ते १२ जुलै एवढा कालावधी दिला असता सुमारे २२ आक्षेप दाखल झाले आहेत. यामध्ये उस्मानाबादेतील सर्वाधिक ११, मुरूम १, तुळजापूर ६ आणि नळदुर्ग येथील आठ अर्जदारांच्या ८ आक्षेपांचा समावेश आहे. यात उस्मानाबाद शहरातील सह्याद्री संताजी राजेनिंबाळकर यांनी प्रभाग १७ मधील गट क्र. १२१, १२२ प्रभाग १० मध्ये समाविष्ट करण्यात यावेत. लहु पवार यांनी प्रभाग नऊ मधील महादेव गल्ली प्रभाग १० अथवा ११ मध्ये समावेशित करावी. अजित माळी यांनी प्रभाग १७ मधील गट क्र. १२१, १२२ प्रभाग क्र.१० मध्ये समाविष्ठ करावेत. यासमीन वलीम पठाण यांनीही अर्ज केला आहे. भानुनगर हा भाग प्रभाग १० ला जोडावा असे म्हटले आहे. बापू जगन पवार यांनी अनुसूचित जमातीचे आरक्षण प्रभाग १४ ऐवजी प्रभाग ७ अथवा १९ मध्ये ठेवावे. सचिन भारत पवार यांनी पोलिस लाईनचा भाग प्रभाग ५ ला जोडावा. अमोल कोरेगावकर यांनी पाथरूड वाड्याचा भाग प्रभाग ७ ला जोडण्यात यावा. तर विद्यानंद बनसोडे यांचे ‘एससी’चे मतदान राखीव प्रभागात ठेवावे, असे म्हणणे आहे. तसा अर्जही त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
पालिका प्रभाग रचना आराखड्यावर २२ आक्षेप
By admin | Updated: July 15, 2016 00:49 IST