जालना : शहरात नियमित स्वच्छता व्हावी तसेच नागरिकांच्या घरांमधील दररोजच्या कचरा संकलनासाठी नगर पालिकेने २१ घंटागाड्या गुरूवारपासून कार्यान्वित केल्या. या वाहनांचे उद्घाटन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. गत वर्षभरापासून शहरातील घंटागाड्या बंदावस्थेत होत्या. त्यामुळे नगर पालिकेने शहर स्वच्छतेसाठी सुमारे दोन कोटी निधीतून नवीन वाहने खरेदी केली होती. काही साहित्य महिनाभरापूर्वी पालिकेला प्राप्त झाले होते. दोन दिवसांपूर्वी घंटागाड्या प्राप्त झाल्या. घंटागाड्या तसेच इतर स्वच्छता साहित्याचे उद्घाटन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अक्षय गोरंट्याल, नगरसेवक शाह आलम खान, महावीर ढक्का, जगदीश भरतिया, संजय देठे, राहुल हिवराळे, आशा ठाकूर, राज स्वामी आदी उपस्थित होते. शहरात दररोज ८० टन कचरा निर्माण होतो. मात्र, पालिकेकडून यंत्रणा कमी असल्याने ५० ते ५५ टन कचरा संकलित होतो. इतर कचरा तसाच पडून असतो. आता नवीन घंटागाड्या तसेच इतर साहित्य उपलब्ध झाल्याने शहर कचरामुक्त होण्याची शक्यता आहे. नगर पालिकेच्या स्वच्छता विभागात २४४ पुरूष मजूर, १४४ स्त्री मजूर तसेच १२ वाहनचालक आहेत. कचरा उचलण्यासाठी पालिकेकडे गुत्तेदारांचे असलेले ट्रॅक्टर ११, डम्पर प्लेझर (कुंड्या उचलण्यासाठी) ४, मोठ्या कुंडीचे प्लेझर एक, सेफटीक टँक स्वच्छ करण्याचे वाहन १, लोडर १ आदी वाहने उपलब्ध आहेत. या आधारे स्वच्छता केली जाणार आहे.
शहरातील कचरा संकलनासाठी २१ घंटागाड्या कार्यान्वित
By admin | Updated: December 29, 2016 23:11 IST