ल्ाातूर : खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यम विद्यालयांतील शिक्षक भरतीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. ना हरकत प्रमाणपत्राशिवाय भरती केल्याचे आढळून आल्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत. गणित, विज्ञान, इंग्रजी विषयांची शिक्षक भरती वगळता हे आदेश आहेत. त्यानुसार लातूरच्या शिक्षण विभागाचे रेकॉर्ड तपासणीसाठी शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहे.प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील नाहरकत प्रमाणपत्राशिवाय करण्यात आलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर ठरविण्यात येणार आहेत. २ मे २०१२ नंतर दिलेल्या नियुक्त्यांना मान्यता देण्यात येऊ नये, असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार नाहरकत प्रमाणपत्राशिवाय नियुक्त्या दिल्या आहेत का? याची तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाचे रेकॉर्डही पुण्याला पाठविण्यात आले आहे. २ मे २०१२ नंतर करण्यात आलेल्या पदभरतीस मान्यता दिल्याचे निदर्शनास आल्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक वाटल्यास फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयाच्या शिक्षक पदभरतीसाठी आणि मागासवर्र्गींच्या भरतीसाठीही हा नियम शिथील आहे. या व्यतिरिक्त भरती केल्याचे आढळल्यास मात्र कारवाई होणार आहे. तसे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. लातूर जिल्ह्यात मात्र मागासवर्गीय शिक्षक, गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांची भरती वगळता अन्य भरती झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
२०१२ नंतरच्या नियुक्त्यांवर येणार गंडांतर !
By admin | Updated: January 8, 2017 23:31 IST