औरंगाबाद : डीएमआयसी प्रकल्पासाठी दुसऱ्या टप्प्यात बिडकीनमधील ४ गावांची ९०० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जमीन संपादनाचा मोबदला वाटपासाठी एमआयडीसीने २०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे दोन गावांतील शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप करण्यात आले, अशी माहिती उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी दिली. डीएमआयसी प्रकल्पाच्या शेंद्रा-बिडकीन मेगा पार्कसाठी दुसऱ्या टप्प्यात बिडकीन परिसरातील ४ गावांची ९०० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. जमीन संपादनाची प्रक्रिया राबविण्यासाठी शेतकऱ्यांना ३२ (२) ची नोटीस बजावण्यात येऊन मोबदला देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली. उद्योग विभागाने जमीन संपादनासाठी ५२० कोटींची तरतूद केली असून, पहिल्या टप्प्यात २०० कोटींचा निधी एमआयडीसीला उपलब्ध करून दिला. एमआयडीसीने हा निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला. प्रशासनाने भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे हा निधी वर्ग केला. ८ दिवसांपासून शेतकऱ्यांना मोबदला वाटपाचे काम हाती घेण्यात आले आहे. चिंचोली येथील ४५ शेतकऱ्यांना आणि निलजगाव येथील ८० शेतकऱ्यांना मोबदला वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. काही प्रकरणे वादात असल्याने निधीचे वाटप करण्यात आले नाही. आणखी ३२० कोटींची गरज भूसंपादनासाठी आणखी ३२० कोटींच्या निधीची आवश्यकता असून, हा निधी एमआयडीसीकडून उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. शेतकऱ्यांना मोबदला वाटप करण्याचे काम जलद गतीने होत असून, वर्ग-२ च्या जमिनींची प्रकरणे निकाली काढण्यात येत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांनाही मोबदला दिला जात आहे. जूनअखेरपर्यंत भूसंपादन मोबदला वाटपाचे काम पूर्ण केले जाईल, असा दावा भूसंपादन अधिकारी नेटके यांनी केला.
डीएमआयसीसाठी २०० कोटींचा निधी
By admin | Updated: June 5, 2016 23:56 IST