कळमनुरी : आयएसओ नामांकनासाठी तालुक्यातील २० अंगणवाड्यांनी तयारी केली असून या अंगणवाड्या तपासणीसाठी सज्ज झाल्या आहेत. पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी जि. प. प्रशासन विशेष प्रयत्न करीत आहे. या २० अंगणवाड्यांची पहिली प्राथमिक तपासणी संस्थेमार्फत करण्यात आली आहे. अंगणवाड्यांचे काम चांगले असल्याचे तपासणी पथकाने त्याबाबत समाधान व्यक्त केले असल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश जोंधळे यांनी सांगितले. या २० अंगणवाड्याचे आयएसओसाठी रजिस्ट्रेशन झाले आहे. पार्डी, येलकी, गोरगव्हाण, नांदापूर, सावंगी (भुतनर) झरा, पोत्रा, डोंगरकडा, आखाडा बाळापूर, किल्लेवडगाव, बोथी, सालापूर, वारंगा यासह २० अंगणवाड्याचा समावेश आहे. या अंगणवाड्यांनी रंगरंगोटी परिसर स्वच्छता, परसबाग, अंगणवाडीची इमारत, बोलक्या भिंती शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंगणवाडी कार्यकर्तीचे प्रशिक्षण, अभिलेखे, बालकांना पुर्व प्राथमिक शिक्षण आदी बाबी पुर्ण केलेल्या आहे. आयएसओ नामांकनासाठी लागणारे २६ निकष या अंगणवाड्यांनी पुर्ण केले आहेत. आयएसओ नामांकनासाठी एका सामाजिक संस्थेमार्फत अंगणवाड्यांना मार्गदर्शन करून पुर्तता पुर्ण करून घेतल्या जातात. या २० अंगणवाड्यांची पहिली तपासणी झाली असून उर्वरित दोन तपासण्या लवकरच होणार आहेत. ३ तपासण्यानंतर अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा दिला जाणार आहे. तालुक्यातील सर्वच अंगणवाड्या टप्प्याटप्प्याने आयएसओ दर्जा प्राप्त करणार आहेत. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन जोंधळे यांनी केले आहे. काही गावांमध्ये लोकसहभागातून साहित्य अंगणवाडी केंद्रांना देण्यात येत आहे. (वार्ताहर)
२० अंगणवाड्या नामांकनास सज्ज
By admin | Updated: August 29, 2014 01:26 IST