लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : येथील संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थी निवडीसाठी समितीची बैठक तब्बल ११ महिन्यांपासून झालेली नाही. त्यामुळे तहसील कार्यालयाकडे प्राप्त झालेले जवळपास २ हजार प्रस्ताव मान्यतेअभावी धूळ खात पडून आहेत.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजना, विधवा परितक्त्या निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर शासनाच्या वतीने त्यांना दरमहा ६०० रुपये मानधन दिल्या जाते. तालुक्यामध्ये इंदिरा गांधी, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन निराधारांची संख्या जवळपास ४ हजार २६ आहे. तर इंदिरा गांधी विधवा निराधार लाभार्थ्यांची संख्या ५७ असून राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन लाभार्थ्यांची संख्या ७ आहे. संजय गांधी निराधारचे १ हजार ९२३, श्रावणबाळ योजनेतील ४०८ लाभार्थी आहेत. या व्यतीरिक्त तालुक्यातील तब्बल २ हजार लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक व इतर कारणामुळे ११ महिन्यांपासून निराधार योजना लाभार्थी निवड समितीची बैठक झालेली नाही. तहसील विभागाकडे आलेले २ हजार प्रस्ताव मान्यतेअभावी पडून आहेत. लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष तहसीलदार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थ्यांची निवड केली जाते. तहसीलदार पदावर पुर्ण वेळ अधिकारी नसल्याने लाभार्थी निवडीसाठीही उशिर होत असल्याचे बोलले जात होते. एक महिन्यापुर्वी तहसीलदार पदाचा पदभार सुरेश शेजुळ यांनी स्विकारल्यामुळे लाभार्थी निवडीची बैठक तातडीने होईल, असे वाटत होते. परंतु, शेजूळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अद्यापही बैठक झालेली नाही. त्यामुुळे प्रस्ताव दाखल केलेले लाभार्थी तहसील कार्यालयामध्ये चकरा मारीत आहेत. शिवाय सध्याच्या लाभार्थ्यांना तीन ते चार महिन्याला मानधन मिळत असल्याने त्यांना विविध अडचणीना लाभार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.
२ हजार प्रस्ताव धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2017 23:35 IST