जाफराबाद : जाफराबाद तालुक्यात दुष्काळ परिस्थितीत मोठ्या प्रमाणात शेततळे होऊन याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, अशी अपेक्षा शेतकरीवर्गामध्ये व्यक्त होत असताना केवळ १९ शेततळ्यांना जिल्हा कृषी कार्यालयाने मंजुरी दिली आहे. तालुका कृषी कार्यालयामार्फत २७० प्रस्ताव आले होते. पैकी १९ मंजूर झाल्याने पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे काही झाले नाही. मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे देणार असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र, तसे काहीच झाले नाही.तालुका कृषी कार्यालयाने सुद्धा आॅनलाईन दाखल केलेल्या २७० प्रस्तावांपैकी ७० शेततळे देण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात हातात मात्र १९ मिळणार आहे. उर्वरित शेततळ्यांना काय उत्तरे द्यायची हा प्रश्न पडणे सहाजिक आहे. त्यातही मागणी एक आणि मिळाले दुसरेच आहे. शेतीला पूरक पाणीसाठा याचा विचार न होता ३४ बाय ३४, २४ बाय २४ व १४ बाय ३.४ या साईजमध्ये करता येणार आहे. शेततळ्याकरीता तालुक्यातील १०१ गावांमधून प्रस्ताव आले होते. विशेष म्हणजे मंजूर करण्यात आलेले शेततळे मंजूर करताना तालुक्याचा समतोल न राखता एकाच भागाला जास्तीचे प्राधान्य देण्यात आल्याचे वरील यादीवरून स्पष्ट होत आहे. (वार्ताहर)
जाफराबाद तालुक्यात १९ शेततळ्यांना मंजुरी
By admin | Updated: December 23, 2015 23:39 IST