लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिका निवडणुकीच्या प्रभाग पद्धतीत २० पैकी १९ प्रभागांत चार वेळा तर सिडको प्रभागात मतदारांना पाच वेळा मतदान करावे लागणार आहे. त्यात काही प्रभागात एकाच मशीनवर दोन उमेदवार राहणार आहेत. त्यामुळे तेथे एकाच मशीनवर दोन वेळाही मतदान करण्याची गरज पडणार आहे.महापालिकेच्या २० प्रभागांसाठी ११ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रभाग १ ते १९ मधील मतदारांना ‘अ, ब, क, ड’ अशा चार वॉर्डासाठी चार मते द्यायची आहेत तर प्रभाग क्र. २० मधील सिडको-हडको मधील मतदारांना मात्र पाच मते द्यायची आहेत. २०१२ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत प्रभागरचना ही दोन वॉर्डाची होती. त्यामुळे दोन मते नांदेडच्या मतदारांनी दिली होती. आता या निवडणुकीत ४ व ५ मते द्यावयाची आहेत.प्रत्येक प्रभागातील ‘अ’ वॉर्डाच्या मतपत्रिकेचा रंग हा पांढरा राहणार आहे. तर ‘ब’ वॉर्डाची मतपत्रिका फिका गुलाबी रंगाची राहणार आहे. ‘क’ वॉर्डाची मतपत्रिका फिका पिवळा रंगाची राहील आणि ‘ड’ वॉर्डाच्या जागेची मतपत्रिकेचा रंग फिका निळा राहणार आहे.महापालिका निवडणुकीत वापरण्यात येणाºया इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनमध्ये काही प्रभागात एकाच मशीनवर दोन उमेदवारांची नावे राहणार आहेत. तर काही प्रभागात तीन मशीन वापराव्या लागणार आहेत. चार उमेदवारांसाठी चार मशीन राहणार आहेत. तेथे मतदान करताना निरक्षर, वृद्ध मतदारांमध्ये संभ्रम राहणार नाही. ज्या ठिकाणी एकाच मशीनवर दोन उमेदवारांची नावे राहतील तेथे मात्र निश्चित संभ्रम राहणार आहे. हा संभ्रम दूर करण्याचे आव्हान उमेदवारांसह निवडणूक यंत्रणेसमोरही राहणार आहे.
१९ प्रभागांत ४ तर सिडकोत ५ वेळा मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:54 IST