बीड : एक हजारामागे १८ जणांना मधुमेह होत आहे़ ही चिंतेची बाब आहे़ याला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा स्तरावर आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे़ १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन आहे़ या निमित्ताने जिल्ह्यातील रूग्णांची तपासणी करून मधुमेह आढळून आलेल्या रूग्णांना मोफत औषध उपचार देण्यात येणार आहेत़ ही मोहीम १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ अशोक बोल्डे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ राम देशपांडे, डॉ़ मधुकर कुलकर्णी, डॉ़ बन यांची उपस्थिती होती़ यावेळी पत्रकारांशी बोलताना डॉ़ बोल्डे म्हणाले की, ३५ वयोगटाच्या पुढील व्यक्तींना डायबेटीज होण्याचे प्रमाण काही अंशी वाढत आहे़ यामुळे प्रत्येकाने आपली आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे़ यासाठी जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे़ १० ते १४ नोव्हेंबर या काळात बीड येथील जिल्हा रूग्णालयात दुपारी २ ते ५ या वेळेमध्ये जिल्ह्यातील मधुमेह रूग्णांची मोफत तपासणी करून त्यांना गोळ्या-औषध देण्यात येणार आहे़ याशिवाय मधुमेह आढळून आलेल्या रूग्णांना समुपदेशन करून आजार नियंत्रण करण्याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे, असे डॉ़ बोल्डे म्हणाले़ते पुढे म्हणाले, आधुनिक युगात प्रचंड स्पर्धेमुळे प्रगतीची गती वाढली आहे़ मात्र व्यायाम व योगासने करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे़ एका जागेवर बसून-बसून अनेक आजाराला निमंत्रण मिळत आहे़ आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीकोणातून जनजागृती बरोबरच दर्जेदार आरोग्य सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा रूग्णालय कसोशीने प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी यावेळी पत्रकारांना बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)
एक हजारामागे १८ जणांना मधुमेह !
By admin | Updated: November 10, 2014 01:18 IST