राजकुमार देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील प्रमुख राज्य रस्ता असलेल्या जिंतूर- सेनगाव- कनेरगाव नाका या राज्य रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. राज्य शासनाने या रस्त्याचा एम.आर.आय.पी. या योजनेत समावेश केला असून जिल्ह्यातील येलदरी-सेनगाव- सवना- मोप ते जिल्हा सिमा या दरम्यान पेव्हड शोर्ल्डरसह दुपरीकरण करण्यासाठी प्रशासकीय, तांत्रिक मान्यता दिली आहे. या कामाकरीता १७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाची लवकरच निविदा निघणार आहे.जिल्ह्यातील येलदरी- सेनगाव- कनेरगाव नाका या राज्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाईट अवस्था झाली आहे. सेनगाव तालुक्यातील प्रमुख मार्ग असलेल्या या रस्त्याचे अनेक वर्षापासून रुंदीकरणाचे काम रखडत पडले आहे. सेनगाव- गोरेगाव-सवना या दरम्यान रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. त्याशिवाय हत्ता पाटी ते येलदरी दरम्यानही रस्ता भुईसपाट झाला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारक पर्यायी रस्ता शोधत आहेत. मराठवाडा- विदर्भाला जोडणाºया या रस्त्याची निधी अभावी कायम अहवेलना झाली आहे. सर्व राज्यरस्त्याचे रुंदीकरण झाले. परंतु हा रस्ता केवळ साडेतीन मीटरचाच व मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेलाच राहिला. परंतु विलंबाने का होईना; या रस्त्याचा कायापालट होणार असून त्यासाठी शासनाच्या वतीने पहिल्यांदाच मोठा निधी तालुक्याकरिता मंजूर झाला आहे. गतवर्षी २९ नोव्हेंबरला हॅब्रिट अॅनोटी या योजनेत सदर रस्त्याचा समावेश करण्यात आला होता. या कामाकरिता १७५ कोटी ३९ लाख २० हजार रुपयांचा अंदाजित खर्चाचा निधी मंजूर करण्यात आला होता. जिल्हाअंतर्गत येणाºया या रस्त्याचे सात मीटरचे डांबरीकरण व दुपरीकरण होणार आहे. पेव्हड शोर्ल्डरसह १० मीटरचा हा रस्ता होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण, लहान पूल, मोºयांची पुनर्बांधणी, रुंदीकरण, काँक्रीट रस्ता, पेव्हड शोर्ल्डस, कच्चे गटर्स, मुरूम बाजूपट्टी, सेवा वाहिन्या नलिका, वृक्ष लागवड इ. कामे होणार आहेत. या रस्त्यावरील सध्याचे अरुंद पूल मोठे होणार आहेत. संपूर्ण रस्ता हा अत्यंत आधुनिक पद्धतीने सपाटीकरण करून विकसित होणार आहे. या कामास यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी मिळाली असून नुकतीच तांत्रिक मान्यता मिळाली. त्यामुळे सदर कामाची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे. तालुक्यातील पहिल्यांदाच रस्त्याच्या विकासाकरिता रेकॉर्डब्रेक निधी मिळाला मिळाल्याने सुसज्ज असा लक्षवेधक रस्ता या निधीतून तयार होणार आहे.
रस्त्याच्या कामासाठी १७५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:48 IST