उस्मानाबाद : येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील ९७१ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले होते़ यातील तब्बल २१२ पाणी नमुने दूषित आढळले असून, जिल्ह्यातील १६६ गावांचा यामध्ये समावेश आहे़ तर सर्वाधिक उस्मानाबाद तालुक्यातील २९ गावे यामध्ये आहेत़जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील जलस्त्रोतातील पाण्याच्या नमुन्यांची उस्मानाबाद येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येते़ जानेवारी महिन्यात ९२५ ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते़ यातील २१४ तर फेब्रुवारी महिन्यात ९७१ पैकी ९७१ नमुने दूषित आढळून आले आहेत़ यात उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक २९ गावांचा समावेश आहे़ यामध्ये कावळेवाडी, गोरेवाडी, कोलेगाव, खामगाव, खेड, सारोळा, घोगरेवाडी, कोळेकरवाडी, तेर, दाऊतपूर, भंडारवाडी, रामवाडी, केशेगाव कारखाना, खामसवाडी, टाकळी (ढो़), नितळी, आनंदवाडी, महाळंगी, चिखली, करजखेडा, वडाळा, बरमगाव, कामेगाव, सांगवी, लासोना पाटी, येडशी, उपळा, शिंगोली तांडा आळणी आदी गावांचा समावेश आहे़ भूम तालुक्यातील २५ गावातील पाणी नमुने दूषित आढळले आहेत़ यात आंतरवली, ईट, देवळाली, आरसोली, गोरमाळा, बावी आदी गावांचा समावेश आहे़ कळंब तालुक्यातील दहिफळ, सापनाई, हावरगाव, देवधानोरा, देवळाली, मोहा, मस्सा खुर्द, खामसवाडी आदी २६ गावांचा समावेश आहे़ लोहारा तालुक्यातील आष्टाकासार, आष्टामोड, भोसगा, भातागळी, बेळंब, केसरजवळगा, आदी ११ गावांचा समावेश आहे़ उमरगा तालुक्यातील बेळंब, तुरोरी, मुळज, दगडधानोरा,नाईचाकूर, कोळेवाडी, बाभळसूर आदी १८ गावांचा समावेश आहे़ परंडा तालुक्यातील नालगाव, पाचपिंपळा, मलकापूर, जवळा, टाकळी आदी १२ गावांचा, तुळजापूर तालुक्यातील काटगाव, यमगरवाडी, तिर्थ बु़, चिंचोली, रायखेल, सिंदफळ, शिराढोण, बारूळ, होनाळा, खंडाळा आदी २४ गावांचा समावेश आहे़ तर वाशी तालुक्यातील सारोळा, पारा, बावी, लाखनगाव, तेरखेडा, खानापूर आदी ११ गावांचा यामध्ये समावेश आहे़ एकीकडे ‘स्वाईन फ्लू’मुळे हैराण असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना या दूषित पाण्यामुळे विविध आजार जडत आहेत़ तर जिल्हा रूग्णालयात दररोज १००० ते ११०० रूग्ण उपचारासाठी येत आहेत़ पाण्यामुळे जडणाऱ्या आजाराचा यात समावेश आहे़ तरी संबंधित ग्रामपंचायतींनी गावातील जलस्त्रोतातील पाणी स्वच्छ व्हावे, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)
१६६ गावांतील पाणी दूषित
By admin | Updated: March 17, 2015 00:41 IST