पैठण : तालुक्यात १ आॅक्टोबरपासून आजपर्यंत १५५ रोहित्र जळाले असून, यापैकी ११० रोहित्र दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आले. यापैकी ४ रोहित्र जायकवाडी येथील गाळणी शाखेत दुरूस्त करण्यात आले आहेत. अद्यापही ४२ रोहित्र दुरुस्त होऊन येणे बाकी आहे. पैठण तालुक्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांना तातडीने रोहित्र दुरुस्त करून देता यावे, यासाठी महावितरणने जायकवाडी येथे गाळणी शाखा उभारण्याचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी रोहित्राच्या प्राथमिक दुरुस्तीस प्रारंभ करण्यात आला असून, अद्ययावत मशिनरी उपलब्ध होताच रोहित्राची पूर्ण दुरुस्ती येथेच करण्यात येणार असल्याचे सहायक कार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड यांनी सांगितले .तालुक्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण १८% एवढे आहे. रोहित्र जळाल्यानंतर ते दुरुस्तीसाठी औरंगाबाद येथे पाठवावे लागत होते. यात किमान महिनाभराचा कालावधी रोहित्र दुरुस्त होऊन येण्यासाठी लागत असल्याने दरम्यानच्या कालावधीत विजेअभावी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत होते .राज्य शासनाने ज्या तालुक्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण जास्त आहे, अशा तालुक्यात रोहित्र दुरुस्तीसाठी गाळणी शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत पैठण येथे ही शाखा उभारण्यात येत असल्याचे अधीक्षक अभियंता फुलकर यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता नामदेव गांधले यांच्या मार्गदर्शनाखाली या शाखेचे काम जायकवाडी येथे करण्यात येत आहे. सुमारे पाच लक्ष रुपये खर्च करून येथे शेड कंपाऊंड वॉल प्लॉटफार्म उभारण्यात आला आहे, तर ट्रान्सफॉर्मर गरम करण्यासाठी लागणारे ओव्हनचा मागणी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. हे ओव्हन येताच सर्व रोहित्रांची दुरुस्ती पैठण येथेच करण्यात येईल, असे रवींद्र गायकवाड यांनी सांगितले. ही शाखा कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना ताबडतोब रोहित्र दुरुस्त करून देण्याची सोय होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
दोन महिन्यांत जळाले १५५ रोहित्र
By admin | Updated: December 8, 2015 00:10 IST