परतूर : परतूर-सातोना रस्त्यावरील चिंचोली नाल्यावरील पुलाचे काम अनेक वर्षापासून रखडले असून, निम्न दुधना प्रकल्प प्रशासनाने याकडे कमालीचे दुर्लक्ष केल्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे.परतूर-सातोना रस्त्याची दुरवस्था होण्याबरोबरच चिंचोली नाल्यावरील पुलाचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे. या नाल्यावरील जुना पूल निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्यात गेल्याने नवीन उंची वाढवून या ठिकाणी पूल करण्यात आला आहे. मात्र, या पुलाचे काम आज चौदा ते पंधरा वर्षापासून रखडले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो व पावसाच्या झडीत या ठिकाणी वाहतूक ठप्प होते.बस बंद झाल्यावर शाळकरी मुलांची शाळाही बंद होऊन शैक्षणिक नुकसान होते. या ठिकाणी चिखल होत असल्याने वाहने घसरतात. पुलाच्या दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहने घसरून जीवित हानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात मुरूम टाकला जातो. याही वर्षी संबंधित कंत्राटदाराने मुरुम टाकून थातूरमातूर डागडुजी सुरु केली आहे. परंतु या मुरमामुळे रस्ता चिखलमय होणार हे स्पष्ट आहे. खड््यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. हा पुल निम्न दुधना प्रकल्प प्रशासनाच्या अखत्यारित येत असल्याने या विभागाने कमालीचे दुर्लक्ष केले आहे. या पुलाचे काम रेंगाळल्याने हे दोन कोटीचे काम आता वीस कोटीच्या घरात गेले आहे. तरी या पुलाचे काम ठप्पच आहे. प्रशासनास त्याचा गंधही नाही. या संदर्भात या कामावरील अभियंता धांडे म्हणाले की, पावसाळा संपताच काम करू, सध्या मुरूम टाकत आहोत. (वार्ताहर)
१५ वर्षापासून पुलाचे काम रखडले
By admin | Updated: August 7, 2014 23:36 IST