उस्मानाबाद : दिवसेंदिवस पोलीस, महसूलसह अन्य विभागातही लाचखोरी बोकाळली आहे. उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील पाच महिन्यांमध्ये १६ लाचखोरांना रंगेहाथ पकडले आहेत. मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये लाचखोरी बळावली आहे. चिरीमिरी दिल्याशिवाय टेबलावरील फाईल पुढे सरकत नसल्याच्या तक्रारी वारंवार होतात. नागरिकांमध्ये हळूहळू जागरुकता येत असल्याने अशा लाचखोरीबाबत थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रारी दाखल केल्या जात आहेत. त्याचाच परिणाम म्हणून की काय रंगेहाथ पकडलेल्या लाचखोरांचा आकडाही वाढू लागला आहे. १ जानेवारी ते १३ जून २०१४ या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत महसूल, पोलीस, जिल्हा परिषद आदी कार्यालयातील मिळून १६ जणांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दरम्यान, राज्याच्या बाबतीत विचार केला असता, हा आकडा पाचशेवर जावून ठेपल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले आहे. या आकड्यावरुन सरकारीबाबूमध्ये लाचखोरी किती भिनली आहे हे लक्षात येते. प्रत्येक महिन्यात जवळपास शंभर केसेस होत आहेत. ही माहिती लाचलुचपत विभागाकडून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)कोणताही शासकीय अधिकारी, कर्र्मचारी अथवा त्यांच्या वतीने एखादा खाजगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अश्विनी भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
५ महिन्यांत १६ लाचखोर जेरबंद
By admin | Updated: June 15, 2014 00:58 IST