औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. संसर्ग टाळण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमाची सक्तीने अंमलबजावणी करण्याच्या अटीवर लग्न लावण्यास परवानगी दिली जात आहे. चालू लग्न हंगामात आजपर्यंत पोलीस आयुक्तालयाने १२६२ लग्नाला परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
मंगल कार्यालय, हॉटेल्स, लॉन्सवर लग्न सोहळ्याला प्रशासनाने मंजुरी दिली आहे; पण ५० लोकांच्या उपस्थितीतच लग्न लावावे अशी अट घालून देण्यात आली आहे, तसेच मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करण्याचे आदेशही दिले आहेत. लग्नात होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्य सरकारने काही नियम करून दिले आहेत. त्यात महापालिका व पोलीस विभागाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुळात प्रशासनाची परवानगी घेतली नसेल तर मंगल कार्यालय किंवा लॉन्स, हॉटेल व्यवस्थापक तुम्हाला लग्न लावू देणार नाही. या नियमाची शहरात काटेकोरपणे पालन केले जात आहे. परवानगीसाठी प्रत्येक मनपा वॉर्ड कार्यालय व स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मंगल कार्यालयाचा अर्ज, लग्नपत्रिका, वधू-वर कडील आधारकार्ड, जन्म दाखला, टीसी आदी कागदपत्रे वाॅर्ड अधिकाऱ्यांकडे द्यावी लागतात. मनपाने परवानगी दिल्यानंतर मंगल कार्यालय ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते तिथे जाऊन पोलिसांना वधू-वराचे आधारकार्ड, टी. सी., परिसरातील पोलीस स्टेशनचे ना हरकत प्रमाणपत्र. मंगल कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र, मनपाची परवानगी अशी सर्व कागदपत्रे दिल्यावर पोलीस आयुक्तालयातून लग्नाला परवानगी मिळते. आजपर्यंत पोलीस आयुक्तालयातून १२६२ लग्नाला परवानगी देण्यात आली आहे.
चौकट
अचूक आकडेवारी कळणार
शहरात दरवर्षी लग्नसराईत किती लग्न लागतात याची एकत्रित आकडेवारी प्रशासनाकडे नव्हती. मात्र, कोरोनाच्या निमित्ताने परवानगी सक्तीची करण्यात आल्याने पोलीस आयुक्तालय व मनपा यांच्याकडे संपूर्ण लग्नसराईत किती लग्न लागले. लग्न करणाऱ्यांची माहिती असणार आहे. या आकडेवारीचा फायदा जीएसटी विभाग व आयकर विभागालाही होणार आहे.