सेनगाव : बांधकाम विभागाची उदासिनता व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका सेनगाव येथील तालुकास्तरीय ग्रामीण रूग्णालय इमारतीस बसला असून, सन २००९ साली रूग्णालय इमारतीचा नारळ फोडण्यात आला; परंतु २०१४ अर्ध्यावर आले असताना इमारतीचे काम मात्र पूर्ण झाले नसल्याची स्थिती आहे. सेनगाव येथील तालुकास्तरीय ग्रामीण रूग्णालयाच्या ३० खाटाच्या रूग्णालय इमारत बांधकामास सन २००९ साली राज्य शासनाने मंजूरी देत ९६ लाख ३ हजार ७३२ रुपये निधी इमारत कामाकरीता उपलब्ध करून दिला. परभणी येथील मे. आशिर्वाद कंन्ट्रक्शन या एजंसीला इमारत कामाचे हिंगोली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राट देण्यात आले. बारा महिने कामाची मुदत असणाऱ्या कामाचे हिंगोली सार्वजनिक बांधकाम विभागाने २४ आॅगस्ट २००९ कार्यारंभ आदेश काढले. बारा महिने मुदतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असताना तब्बल पाच वर्षे उलटले तरी रूग्णालय इमारतीचे काम अद्यापही पूर्ण नाही. प्रारंभी पासूनच संथगतीने व सुमार दर्जाच्या रूग्णालय इमारतीच्या कामाचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पुरता बोजवारा उडाला आहे. पाच वर्षांत इमारतीचे ५० टक्के काम झाले असून, दोन वर्षांपासून संपूर्ण कामच बंद आहे. सद्यस्थितीत इमारतीचा अर्धवट कामाचा सांगाडा कामाच्या प्रतिक्षेत रखडत पडला आहे. एक वर्ष कामाची मुदत असताना पाच वर्षानंतरही काम पूर्ण झाले नसताना या इमारतीचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रभावी अशा कोणत्याच उपाययोजना बांधकाम विभागाकडून केला जात नाहीत. अर्धवट कामाची माहिती देण्यासही लपवा-छपवी केली जात आहे. (वार्ताहर)
१२ महिन्याचे काम ५ वर्षात अपूर्णच
By admin | Updated: June 25, 2014 00:39 IST