राजकुमार जोंधळे लातूरशहरातील आंध्रा बँकेतील दोघा कर्मचाऱ्यांसह एक आडत व्यापाऱ्याला तब्बल ११ लाख रुपयांच्या चलन बदल प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील दोन हजारांच्या नव्या ११ लाख रुपयांच्या नोटांबाबत महिना उलटला तरी अद्याप संभ्रम आहे. आंध्रा बँकेने हे पैसे आपले नसल्याचे जाहीर केल्याने पोलिसांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. शिवाय, या प्रकरणाच्या तपासकामात बँक प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप पोलीसांचा आहे़या पैशांचे ट्रान्झेक्शन आंध्रा बँकेतूनच झाल्याचा दावा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला आहे. याबाबतचे सर्व रेकॉर्ड देण्याबाबत बँकेला पोलिसांनी तीन आठवड्यापूर्वीच पत्र पाठविले आहे. याप्रकरणात बँकेकडून अद्यापही समाधानकारक उत्तर अथवा लेखी अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नाही. यात बँकेकडूनच सहकार्य केले जात नाही. मात्र, २६ नोव्हेंबरपासून या अकरा लाखांच्या नव्या नोटांचा गुंता न सुटल्याने ‘संभ्रम’ कायम आहे. २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री शहरातील अंबाजोगाई रस्त्यावरील एस. टी. वर्कशॉप परिसरात जुन्या नोटा २० टक्के कमिशनवर बदलून देताना आंध्रा बँकेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक हिमांशू राजबहाद्दूर सिंग (२५, रा. सिरसिया ता. अलापूर जि. आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश), रोखपाल शिशुपाल राजपालसिंह आर्य (३६, रा. दमाणी अपार्टमेंट, सोलापूर) आणि आडत व्यापारी मनोज भानुदास घार (३०, रा. कव्हा ता. जि. लातूर) या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून अकरा लाखांच्या दोन हजारांच्या नव्या नोटाही जप्त केल्या. मात्र, या प्रकरणातील जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा देण्याचा व्यवहार झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर या व्यवहारातील जुन्या नोटा कुठे आहेत? हाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. बँकेकडून या व्यवहाराबाबत आपला कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले आहे. बँकेच्या एकाही रूपयाला धक्का लागला नाही. हा पैसा आपला नसल्याचेच बँकेने जाहीर केल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांची आता ‘पंचाईत’ झाली आहे. जर हा पैसा बँकेचा नसेल तर नेमका आला कोठून? याचाही तिढा गेल्या महिनाभरापासून कायम आहे.
आंध्रा बँकेतील ११ लाख रुपयांचा संभ्रम कायम
By admin | Updated: December 29, 2016 22:58 IST