ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 8 - स्टार्चसह विविध प्रकारचे उत्पादन करणाऱ्या गुजरातमधील अनिल लिमिटेड या कंपनीने जिल्ह्यातील सुमारे १७ मका व्यापाऱ्यांना ११ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ७ संचालकांसह १४ जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कंपनीचे संचालक अमोल श्रीपाल सेठ, अनिष के. शहा, कमलभाई आर सेठ, नलिनकुमार ठाकुर, भूमी अंकित ब्रम्हक्षत्रीय, चिंतन जितेंद्र आचार्य, चंद्रेश भूपेंद्र पंड्या, कंपनीचे अधिकारी विषद ए जगासेठ, जयराम पेंडणेकर, अल्केश दवे, शषी मेहता, श्वेतांग पटेल, कंपनीचा खरेदी व्यवस्थापक हर्ष जव्हेरी,अशोक पटेल (सर्व रा.अहमदाबाद)अशी आरोपींची नावे आहेत. आर्थिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यातील काही मका व्यापारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना येऊन भेटले. अनिल कंपनीने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मका उधारीवर खरेदी केली. यानंतर या कंपनीने करारापप्रमाणे त्यांना रक्कम न देता त्यांची सुमारे ११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे सांगितले. यापैकी एक तक्रारदार ऋषिकुमार साहुजी यांचे नवीन मोंढ्यात परम ट्रेडिंग कंपनीचे धान्य खरेदी विक्रीचे दुकान आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांनी जुना मोंढ्यातील ब्रोकर स्वस्तीक कार्पोरेशन मार्फत अनिल लिमिटेडसोबत १ हजार ७ क्वींटल ४ किलो मका विक्रीचा करार केली. या मकाची किंमत १४ लाख ४८ हजार ७५४ रुपये होती. ही रक्कम ९० दिवसात देण्यात येईल,असे सांगून कंपनीने त्यांना अनिल माईन्स आणि मिनरल या दुसऱ्याच कंपनीचा धनादेश पाठविला होता. दुसऱ्या कंपनीच्या नावे धनोदश पाहून तक्रारदाराने कंपनी संचालकांना फोन करुन याविषयी विचारले असता त्यांच्या कंपनीची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्यांनी दुसऱ्या कंपनीचा धनादेश पाठविला असल्याचे असून ९० दिवसासाठी ही रक्कम आमच्या कंपनीत ठेव म्हणून ठेवल्यास तुम्हाला १८टक्के दराने व्याज देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या सांगण्यावरुन तक्रारदाराने ९०दिवसासाठी रक्कम ठेवण्यास होकार दिला. त्यानंतर आरोपींनी दिलेला दुसरा धनादेश अनादर केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुकत अमितेश कुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे करीत आहे.फसवणूकीचा सिलसिला कायम अहमदाबादेतील अनिल लिमिटेडने अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे अमिष दाखवून औरंगाबादेतील एका उद्योजकांची एक कोटीची फसवणूक केल्याची घटना महिनाभरापूर्वी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तीन संचालकांना अटक केली होती. सध्या हे संचालक न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात आहेत.
मका व्यापाऱ्यांना गुजरातच्या कंपनीकडून ११ कोटीचा गंडा
By admin | Updated: March 8, 2017 19:09 IST