लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात अद्ययावत नाट्यगृह उभारण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.या संदर्भात माहिती देताना आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले की, परभणी शहराच्या सांस्कृतिक चळवळीला मोठा इतिहास आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या अनेक दिग्गज कलाकारांनी परभणीत येऊन आपल्या कला सादर केल्या आहेत. त्यामुळे नाट्यचळवळीत परभणीचे नाव सर्वत्र पोहचले आहे. अशातच चार ते पाच वर्षापूर्वी नटराज रंगमंदिर बंद पडले. त्यामुळे कलाप्रेमींनी नाट्यगृह उभारणीची मागणी केली. त्या अनुषंगाने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे नाट्यगृहासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने ५ कोटी रुपयांचा निधी अर्थखात्याने मंजूर केला. हा निधी अपुरा पडत असल्याने वाढीव निधीची मागणी केली. तसा प्रस्तावही शासनाकडे सादर केला. १८ सप्टेंबर २०१५ रोजी शहरातील अल्पबचतभवनची जागा नाट्यगृहासाठी देण्याचे जिल्हाधिकाºयांनी नाहरकत प्रमाणपत्र दिले, तसे मनपा आयुक्तांना कळविले. तत्कालीन पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०१६ रोजी भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर वाढीव निधीसाठी पाठपुरावा केला व ३ आॅगस्ट रोजी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी नवीन नाट्यगृहासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्रान्वये कळविले असल्याचे आ.डॉ.राहुल पाटील यांनी सांगितले.
नाट्यगृहाला १० कोटी मंजूर-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:52 IST