हिंगोली : हिंगोली - कनेरगाव नाका या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मिळणार असल्याची माहिती आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी दिली.हिंगोली- कनेरगाव नाका या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी निधी मिळावा, यासाठी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती. तसेच हा निधी मिळावा या करीता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शिफारस करावी, अशी विनंतीही आ. गोरेगावकर यांनी शिक्षण मंत्री दर्डा यांच्याकडे केली होती. या संदर्भात शिक्षण मंत्री दर्डा यांना दिलेल्या निवेदनात या रस्त्यावर आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशकडे जाणारी प्रचंड जड वाहतुक होते. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. वाहनधारक व जनतेची गैरसोय दुर करण्यासाठी निधी देण्यात यावा, असे नमुद करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी या रस्त्याच्या दुरूस्तीकरीता विशेष निधी देण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानुसार लवकरच हा निधी मिळणार असल्याचे आ. गोरेगावकर यांनी सांगितले. या निधी साठीचा तांत्रिक अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने यापुर्वीच राज्य शासनाकडे सादर केला असल्याचे आ. गोरेगावकर म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
हिंगोली- कनेरगाव रस्त्यासाठी १० कोटींचा निधी लवकरच मिळणार
By admin | Updated: June 20, 2014 00:06 IST