लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : आदिवासी वसतिगृहातील खोल्यांमध्ये गाद्यांचा अभाव, वीज बंद, ७५ विद्यार्थ्यांसाठी एकच नळ अशा नानाविध अडचणींचा पाढा वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मांडल्यानंतर लोकप्रतिनिधींना धक्काच बसला.आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष तथा आ. डॉ. संतोष टारपे यांनी हदगाव तालुक्यातील आदिवासी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. बैठकीत आदिवासी वसतिगृहातील समस्यांचा पाढा विद्यार्थ्यांनी आ. टारफे यांच्यासमोर वाचला. वसतिगृहातील ७५ पैकी ३१ विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी गाद्या नाहीत. विजेअभावी वसतिगृहातील पंखे बंद आहेत. संगणक नाहीत. आंघोळीसाठी एकच नळ आहे. त्यामुळे तासन्तास विद्यार्थी आंघोळीसाठी थांबून असतात. क्रीडा साहित्याचाही अभाव आहे. मागील दहा पंधरा दिवसांपासून विद्युतपंत जळाल्याने पाण्याचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्याचे फिल्टर नादुरुस्त आहे. एकाच टाकीतील पाणी गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी म्हणून वापरले जाते. तेही खराब झाल्याने विद्यार्थ्यांना त्वचारोग होत असल्याचे यावेळी सांगणयात आले. वॉर्डन कायमस्वरुपी नाहीत, मोबाईलही घेत नाहीत, अडचणी सांगाव्या कुणाला? असा सवाल विद्यार्थ्यांनी यावेळी केला. निर्वाह भत्ता मागील पाच महिन्यांपासून मिळाला नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. बैठकीला उपस्थित किनवट प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे एस. आर. जगदाळे यांनी समस्या जाणून घेतल्या. येत्या आठवडाभरात उपरोक्त समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन आ. टारफे यांनी विद्यार्थ्यांना दिले. आमच्या विद्यार्थ्यांना एका हॉलमध्ये तर दुसºया विद्यार्थ्यांना अन्य हॉलमध्ये बसविले जाते, असा आरोप काही पालकांनी यावेळी केला. एकूणच हा प्रकार भयानक असून शाळा प्रशासन, विद्यार्थी, पालक यांची बैठक लवकरच जिल्हापातळीवर घेतली जाईल, असे टारफे यांनी सांगितले.
७५ विद्यार्थ्यांसाठी १ नळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:47 IST