कुस्ती स्पर्धा : चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयोजनचंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जिल्हा कुस्तीगर संघ व जगतगुरू व्यायामशाळेच्या सहकार्याने महापौर चषक कुस्ती स्पर्धा स्थानिक गांधी चौक येथे झाली. यात युवराज भोसले व स्वाती शिंदे महापौर चषकाचे मानकरी ठरले.कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी कंचर्लावार होत्या, तर आमदार नाना शामकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह, पुस्तक व गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर हंसराज अहीर, राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर यांनी कुस्ती स्पर्धेला संबोधित केले. तद्नंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर वसंत देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, सभापती एस्तेर शिरवार, अंजली घोटेकर, अजय खंडेलवाल, रितेश (रामू) तिवारी, अनिल फुलझेले, संदीप आवारी, राजेश अडूर, राजकुमार उके, विनयकुमार जोगेकर, राहूल पावडे, ललिता गराड, सुषमा नागोसे, विणा खनके, चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शरद टेकुलवार पहिलवान, रघुविर अहीर, शुभम त्रिवेदी यांची उपस्थिती होती.कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. महापौर चषक किताबाकरिता आॅलिम्पिक कॅम्पसाठी निवड झालेली महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू स्वाती शिंदे कोल्हापूर तर महाराष्ट्र पदक विजेती नंदिनी साळुंके कोल्हापूर यांच्यात लढत होऊन स्वाती शिंदे ही विजेती ठरली. तिला मान्यवरांच्या हस्ते मानाचा पट्टा, स्मृतीचिन्ह व रोख २१ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला, तर उपविजेती नंदिनी साळुंके हिला स्मृतीचिन्ह व रोख रक्कम ११ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. तसेच महापौर चषक पुरुष किताबाकरिता अहमदनगरचा युवराज भोसले व नाशिकचा गौरव गनोरे यांच्यात लढत होवून अहमदनगरचा युवराज भोसले हा विजेता ठरला. त्याला मान्यवरांच्या हस्ते मानाची गदा, मानाचा पट्टा, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम ५१ हजार रुपये पुरस्कार देण्यात आला तर उपविजेता गौरव गनोरे नाशिक याला स्मृतीचिन्ह व रोख रक्कम २५ हजार रुपये पुरस्कार देण्यात आला. (प्रतिनिधी)
युवराज भोसले व स्वाती शिंदे महापौर चषकाचे मानकरी
By admin | Updated: February 3, 2016 01:06 IST