मूल: ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, यासाठी समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलने झाली. परंतु अजूनही जनगणनेसाठी शासनस्तरावर पाऊल उचलले नाही. यामुळे मूल येथील ओबीसी समन्वय समितीचे निमंत्रक मंगेश पोटवार यांनी गणराज्य दिनी सकाळपासून ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, असे लिहिलेले बॅनर परिधान करून नागरिकांसोबतच प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
केंद्र शासनाने ओबीसीची जातनिहाय जनगणनेसाठी स्वतंत्र रकाना दिलेला नाही, यामुळे ओबीसीना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, यासाठी मागील महिण्यात चंद्रपुरात विशाल मोर्चा काढण्यात आलेला होता, त्यासोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यात आंदोलनाची रूपरेषा आखण्यात येत आहे, परंतु केंद्र शासनाने ओबीसींच्या जनगणनेसाठी पुढाकार घेतला नसल्याने मूल येथील ओबीसी समन्वय समितीचे निमंत्रक व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी प्रदेश प्रतिनिधी मंगेश पोटवार यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पांढरा शुभ्र वस्त्र परिधान केलेले असताना त्यावर ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, असे लिहिलेले बॅनर परिधान करून प्रशासकीय भवनासमोर उभे राहून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. त्यासोबतच त्यांनी प्रशासकीय भवनामधील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमालाही हजेरी लावली.