बल्लारपूर: येथील बालाजी वॉर्डातील प्रवीण नारायण परांजपे (२५) या उच्चशिक्षित तरुणाचे नागपुरात अपघाती निधन झाले. त्याने जयपूर येथून नुकतेच एमटेक केले होते,प्रवीण हा नागपूरला महाल भागात राहात असलेल्या भावाकडे गेला होता. २४ जूनला सकाळी ब्रेड विकत आणायला जातो म्हणून घरातून गेला तो परत आलाच नाही. त्याचे प्रेतच त्यांच्या कुटुंबीयांना नागपूरच्या मेयो हास्पिटलमध्ये बघायला मिळाले, प्रवीणला रेल्वे पोलिसांनी जखमी अवस्थेत मेयोमध्ये दाखल केले होते. तेथे त्याचे निधन झाले. अनोळखी व बेवारस म्हणून रुग्णालयात त्याची नोंद करण्यात आली होती. तो हरविल्यानंतर तेथील वृत्तपत्रातील एका बातमीवरुन त्याच्या भावाने मेयोमध्ये जाऊन बघितले व त्याला ओळखले. अपघाताने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. सोबतच, त्याचा घातपात तर झाला नसावा ना अशीही शंका व्यक्त केली जात आहे. प्रविणचे वडील नारायण परांजपे हे येथील वनविकास महामंडळात अकाऊंटंट पदावर कार्यरत आहेत, तर आई माया परांजपे या लोकमत सखी मंचच्या येथील सक्रीय सदस्य आहेत. त्यांना तीन मुल असून प्रवीण हा मधला मुलगा होता. रविवारी त्याच्यावर येथील मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
बल्लारपूरच्या युवकाचे नागपुरात अपघाती निधन
By admin | Updated: June 29, 2015 01:41 IST