भद्रावतीत बंद : शासकीय नोकरीनंतरच बंदी करा भद्रावती : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्याच्या निषेधार्थ भद्रावती येथील दारू दुकान आणि बार, रेस्टारेन्टमधील कार्यरत महिला पुरुष कामगारांनी शुक्रवारी भद्रावती शहर कडकडीत बंद ठेवून एका महिलेस १५ कामगारांनी मुंडण आंदोलन केले. आधी कामगारांना शासकीय सेवेत सामावून घ्या त्यानंतरच दारूबंदी करा, या मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.१ एप्रिलपासून होणार असलेल्या दारूबंदीच्या अंमलबजावणीमुळे बार आणि दारू दुकानात कार्यरत हजारो कामगारंवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. शासनाने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकिय नोकरीत सामावून घ्यावे तसेच वयोवृद्ध कामगारांना सेवानिवृत्त वेतन द्यावे नंतरच दारूबंदी करावी, अशी मागणी कामगारांनी केली. शासनाने निर्णय न घेतल्यास आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. देशी दारू दुकान आणि बार व रेस्टारंट महिला पुरुष कामगार संघटना तसेच विदर्भ प्रहार कामगार संघटना, भद्रावतीच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले होते. तहसील कार्यालयासमोरील धरणे मंडपात कामगारांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी सरस्वती कोयताडे या महिला कामगारासह निर्धार घुगुल, सतिश गोवारदिपे, विनोद खोब्रागडे, मोरेश्वर ढेंगणे, किशोर गेडाम, तुकाराम शेंडे, विनोद महाकुलकर, लक्ष्मीनारायण बोगलवार, मोतीराम खोब्रागडे, राजु देवगडे, बालाजी बोरकर, सुधाकर गरगडे, विनोद अल्लेवार, हेमंत बेलखुडे या १५ कामगारांनी मुंडण करून शासनाच्या धोरणाचा निषेध केला. (शहर प्रतिनिधी)
दारूबंदी विरोधात कामगारांचे मुंडण
By admin | Updated: March 21, 2015 01:34 IST