मूल : तालुक्यातील आकापूर स्थित असलेल्या राजुरी स्टील अॅन्ड अलॉय लिमीटेड या कंपनीत कोणत्याही प्रकारची सूचना व वेतन न देता १४ मेपासून कामगारांना कमी केले. १० जूनला सरकारी अधिकारी विशाखा बनकर यांच्या समक्ष झालेल्या करारास मुठमाती देवून कामगारांना बंद केले. यासाठी न्याय मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे अध्यक्ष सुमित समर्थ यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.राजुरी स्टील अॅन्ड अलॉय लिमीटेड, आकापूर येथे कामगारांना कामावरुन बंद केल्याने न्याय मागण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात असाली. त्यानंतर १० जूनला सरकारी कामगार अधिकारी यांच्या समक्ष कामगार नेते व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला. त्यानुसार १५ जून २०१४ पासून कामावर घेण्याचे ठरविण्यात आले. मात्र वरील तारखेला सदर कामगार कामावर गेले असता कंपनीच्या व्यवस्थापकाने कामावर घेण्यास नकार दिला. त्यामुळे झालेल्या कराराचे कंपनीचे उल्लंघन केल्याचा आरोप कामगारांनी केला. कामगारांना न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे अध्यक्ष सुमित समर्थ यांनी प्रयत्न चालविला. मात्र कंपनीने प्रतिसाद न दिल्याने अखेर कामगारांनी कंपनीच्या समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.कामगारांचे २५ जूनपासून धरणे आंदोलन सुरू असून नवव्या दिवशी सुद्धा कंपनीने काहीही तोडगा काढला नाही. त्यामुळे धरणे आंदोलन तिव्र करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
राजुरी स्टील कंपनीत कामगारांचे धरणे आंदोलन
By admin | Updated: July 5, 2014 23:30 IST