बाबासाहेब वासाडे : विविध कार्यकारी सहकारी संस्था संचालकांचा सत्कारचंद्रपूर : केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण जाहीर केले. परंतु शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात आजही मोठ्या अडचणी आहेत. विविध कार्यकारी संस्थांनी आता शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. सुदैवाने आपल्या परिसरात आता सिंचनाची सोय झाली असून पतपुरवठा सुरू झाला तर त्यांचा विकास कुणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवनियुक्त संचालकांनी शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कार्य करावे, असे आवाहन सहकारी व शिक्षण महर्षी अॅड. बाबासाहेब वासाडे यांनी केले.ते कृषी जीवन विकास प्रतिष्ठानच्या वतीने बल्लारपूर इंस्टिट्युट आॅफ टेक्नालॉजी येथे आयोजित विविध कार्यकारी सहकारी संस्था कोठारीच्या नवनियुक्त संचालकांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी वरिष्ठ नेते डॉ. देवानंद गुरू, संस्थेचे सचिव विजय वासाडे, जि.प. सदस्य चंद्रकांत गुरू, प्राचार्य वासुदेव कांबळे यांची उपस्थिती होती. अॅड. वासाडे म्हणाले, काही महिन्यांपूर्वी इस्त्राईल येथे जाऊन डॉ. माही व कृ.जि.वि. प्रतिष्ठानचे संचालक प्रशांत वासाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासोबत तेथील आधुनिक शेतीचा अभ्यास केला. त्या आधारावर बल्लारपूर, पोंभूर्णा, गोंडपिपरी व राजुरा येथील शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली. इस्त्राईल तत्वावर शेतकरी शेती करण्यास तयार असला तरी त्याला तंत्रज्ञान मिळवून देणे, पाणी देणे, पतपुरवठा करणे काळाची गरज आहे. सुदैवाने पळसागाव, आमडी उपसा सिंचन योजना ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून पूर्ण झाली. पाईप लाईनचा वापर सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे आता नुकसान होणार नाही. असे असले तरी इस्त्राईलच्या धरतीवर शेती करण्यासाठी तयार असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. उपसा योजना पूर्ण झाल्याने पळसगाव, आमडी, कळमना, कोर्टी, दहेली व बामनी या गावातील सहा हजार एकराला सिंचनाची सोय होणार आहे. या शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अॅड. वासाडे यांनी चंद्रकांत गुरू यांचे कौतुक केले. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कार्य करा
By admin | Updated: September 29, 2016 00:58 IST