चंद्रपूर : सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुुमारास चंद्रपुरात झालेल्या पाच मिनिटाच्या वादळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आझाद बागेतील विद्युत तारांवर झाड कोसळल्याने जयंत टॉकीज जवळील विद्युत जनित्र रस्त्यावर वाकले. वीज वितरणने वेळीच वीज पुरवठा बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली. सोमवारी दुपारी बारा वाजतापासून शहरात ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस येण्याची कोणतीच शक्यता नव्हती. दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाच ते दहा मिनिट पाऊस झाला. वादळ एवढे सोसाट्याचे होते की, शहरातील अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. आझाद बागेतील मोठे सावरीचे झाड विद्युत तारांवर कोसळले. त्यामुळे जयंत टॉकीज जवळ असलेल्या विद्युत जनित्रावर भार पडून जनित्र रस्त्यावर वाकले. मात्र, येथील नागरिकांनी वेळीच वीज वितरण कंपनीला घटनेची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. वाकलेले जनित्र पाहण्यासाठी जटपुरा मार्गावर नागरिकांची गर्दी होती. अखेर वाहतूक पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन खोळंबलेली वाहतूक आझाद बागेसमोरील पार्र्कींगमधून काढावी लागली. त्यानंतर वीज वितरण कंपनीने क्रेनच्यासाह्याने जनित्र सरळ करण्याच्या कामाला सुरुवात केली. रात्री उशीरापर्यंत जनित्राचे काम पूर्ण झाले नव्हते. यामुळे परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडीत होता. (स्थानिक प्रतिनिधी)
वादळी पावसाने चंद्रपुरात तारांबळ
By admin | Updated: October 6, 2014 23:09 IST