चंद्रपूर: राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दुर्गापूर ओपन कास्टमधील दौऱ्यात दिसलेल्या त्रुट्यांमुळे आता या खुल्या खदानीवर बंदचे गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्र्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेकोलिवर आपली पकड घट्ट करीत ही खाण बंद करण्यासंदर्भात मुख्यालयाकडे अलिकडेच प्रस्ताव पाठविला आहे. महाराष्ट्र्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी या खाण व्यवस्थापनाला सुरक्षा आणि प्रदूषण नियंत्रणासंदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र खाण व्यवस्थापनाने या सूचनांना ठेंगा दाखविल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आत्मसन्मान जागा झाल्याचे या हालचालीवरून पहिल्यांदाच जाणवत आहे. कोळसा खाणीच्या मार्गावर मोठाले खड्डे असणे, त्याचे डांबरीकरण न करणे, त्यावर मोठ्या प्रमाणात धुळ असणे, त्यामुळे प्रदूषण वाढणे, पाण्याची फवारणी न करणे, खाणीतून निघणारे पाणी कसलीही प्रक्रिया न करता सोडणे, क्षमतेपेक्षा अधिक कोळशाचे वहन करणे, खाणीजवळच ओव्हरबर्डन उभारणे, त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा होणे आदी मुद्यांचा यात समावेश आहे. प्रदूषण नियंत्रण मंडयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. हा प्रस्ताव मुख्यालयाकडून कितपत मनावर घेतला जातो, हे आता महत्वाचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
वेकोलि दुर्गापूर ओपन कास्ट बंद होणार ?
By admin | Updated: February 11, 2015 01:09 IST