लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : 'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी) हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना 'महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल' मध्ये (एमएमसी) नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधे देण्याचा अधिकार प्राप्त होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक मजबूत होईल, असा दावा होमिओपॅथीक डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. तर १ वर्षाच्या फार्माकॉलॉजीचा अभ्यास करणाऱ्यास एमएमसीत नोंदणी करणे चुकीचे आहे, असे इतर संघटनेचे म्हणणे आहे.
स्वतंत्र नोंदवहीत नोंद करण्याचे आदेश
'सीसीएमपी' कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांना 'एमएमसी'मध्ये नोंदणी करण्यासाठी त्यांच्या नावाची एक स्वतंत्र नोंदवही तयार केली जाणार आहे. या नोंदवहीतील डॉक्टरांनाच ॲलोपॅथीची औषधे देण्याची परवानगी असेल.
खेड्यापाड्यातील रुग्णसेवा मजबूत होणार
ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी अॅलोपॅथी डॉक्टरांची संख्या कमी आहे. अशा ठिकाणी होमिओपॅथी डॉक्टर मोठ्या प्रमाणावर सेवा देतात. त्यांना ॲलोपॅथी औषधे देण्याचा अधिकार मिळू शकतो.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे सेवाबंद आंदोलन
५ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या माध्यमातून बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांचा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याच्या अधिसूचनेचा निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रतर्फे १८ सप्टेंबर सकाळी ८ ते १९ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत सेवाबंद आंदोलन पुकारले आहे.
प्रॅक्टिससाठी काय नियम-अटी ?
या नव्या नियमांनुसार, होमिओपॅथी डॉक्टरांना फक्त त्यांच्या 'सीसीएमपी' कोर्समध्ये शिकवलेल्या औषधांचीच प्रॅक्टिस करता येईल. ते सर्व प्रकारची अॅलोपॅथी औषधे देऊ शकत नाहीत. विशेषतः गंभीर आजारावरील औषधे, शस्त्रक्रिया किंवा विशेषज्ञांच्या कामाशी संबंधित औषधे देण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांच्यावर 'एमएमसी' आणि आरोग्य विभागाचे कडक नियंत्रण असेल.
जिल्ह्यात शेकडो होमिओपॅथी डॉक्टर
चंद्रपूर जिल्ह्यात शेकडो होमिओपॅथी डॉक्टर आहेत. ज्यापैकी बहुतांश डॉक्टर ग्रामीण आणि निमशहरी भागात प्रॅक्टिस करतात. यापैकी अनेक डॉक्टरांनी 'सीसीएमपी' कोर्स पूर्ण केला आहे.
"केवळ १ वर्ष कालावधीत फार्माकॉलॉजीचा तोकडा अभ्यास करून एमबीबीएस एमडी, एमएस, एमसीएच डीएम व डीएनबी डॉक्टरांच्या कौन्सिलमध्ये नोंदणी करणे हे अॅलोपॅथी डॉक्टर तसेच रुग्णांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे शासनाने हा आदेश मागे घ्यावा यासाठी आमच्या संघटनेकडून १८ सप्टेंबरला बेमुदत सेवा बंद ठेवणार आहोत."- रितेश दीक्षित, अध्यक्ष आयएमए संघटना, चंद्रपूर