वरोरा : पत्नीने रागाच्या भरात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीही जळून जखमी झाला. सदर घटना वरोरा तालुक्यातील चारगाव (बु.) येथे सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या पती- पत्नीची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. प्रफुल्ल सुभाष शेडामे (२९) व शिल्पा प्रफुल्ल शेडामे असे जखमी पतीपत्नीचे नाव आहे. शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चारगाव (बु.) येथील प्रफुल्ल शेडामे याचा विवाह दोन वर्षांपूर्वी शिल्पा नामक युवतीशी झाला. त्यांना एक वर्षाची मुलगी आहे. २३ फेब्रुवारीला रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रफुल्लची पत्नी शिल्पा हिने अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला जाळून घेतले. पत्नी जळत असल्याचे बघून प्रफुल्लने आरडाओरड करीत शिल्पाला वाचविण्याचे प्रयत्न केला. यात प्रफुल्लही जळून जखमी झाला. प्रफुल्ल व शिल्पाला जखमी अवस्थेत वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर दोघानाही चंद्रपूर येथे हलविण्यात आले. घटनेनंतर वरोरा पोलिसांनी जखमी शिल्पाचे बयाण नोंदविले असून त्यात ‘मी स्वत:हून जाळून घेतले आहे. यामध्ये मला कुणाविरुद्ध तक्रार करावयाची नाही’ असे नमूद केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
जळणाऱ्या पत्नीला वाचविताना पती जखमी
By admin | Updated: February 25, 2015 01:25 IST