लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेकवेळा योग्य आहार न घेतल्याने तसेच बाळंतपणात वजन वाढण्याकडे लक्ष न दिल्याने गरोदर मातांचा मृत्यू होतो. हे मृत्यू टळावे, महिलांची प्रसूती नॉर्मल व्हावी, यासाठी चंद्रपूर आरोग्य विभागाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून गरोदर मातांच्या घरासमोर त्यांच्या वजनाचे स्टिकर लावण्यात येत आहेत. यामुळे गरोदर मातांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जनजागृती होत असून, मातांना आपले वजन किती वाढवायचे आहे, हे या स्टिकरच्या माध्यमातून लक्षात येणार आहे. यामुळे माता मृत्यूचे प्रमाण टाळता येईल, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
मातांमध्ये आपल्या आरोग्यासंबंधी जनजागृती व्हावी, कुटुंबीयांनाही आपल्या घरातील गरोदर मातेचे वजन किती आहे आणि किती वाढवावे लागेल, काय काळजी घ्यावी लागेल, यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी मूल तालुक्यातील बेंबाळ येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर भट्टाचार्य यांनी परिसरात गरोदर मातांच्या घरासमोर त्यांच्या वजनाचा तसेच बॉडी मास्क इंडेक्सनुसार किती वजन वाढवावे लागेल, यासाठी वेट स्टिकर लावले होते.
याचा चांगला फायदा गरोदर मातांना झाला. त्यामुळे आता जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यामध्ये गरोदर मातांच्या घरासमोर त्यांच्या वजनाचे स्टिकर लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे. अनेक मातांच्या घरासमोर असे स्टिकरही लागले आहे.
बीएमआयनुसार वजन वाढविणारगरोदर मातांचे वजन केल्यानंतर त्यांच्या उंचीनुसार किती वजन वाढवावे लागते, यासाठी बॉडी मास्क इंडेक्सनुसार चार्ट तयार करण्यात येत आहे. त्यानुसार त्या वजनाचे स्टिकर लावल्या जात आहे.
"माता मृत्यू, बाल मृत्यू आणि कुपोषण थांबविण्यासाठी वेट स्टिकर हा पर्याय निवडण्यात आला आहे. यामुळे गरोदर मातांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी होऊन सुदृढ बालकांचा जन्म होण्यास मदत होईल. यासोबतच आईचे आरोग्य सुद्धा चांगले राहील. याचा माता मृत्यू रोखण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे."- डॉ. किशोर भट्टाचार्य, जिल्हा साथरोग अधिकारी, चंद्रपूर