लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी तब्बल ६ हजार ८५३ नव्या मतदारांची संशयास्पद नोंदणी झाल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत राजुऱ्यातील या प्रकरणाकडे लक्ष वेधले. विशेष म्हणजे, या सर्व मतदारांची माहिती अपूर्ण, चुकीची अथवा संशयास्पद असल्याने ही नोंदणी बोगस असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या नोंदणीविरोधात तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील पुढील तपास निवडणूक आयोगाकडून अपेक्षित माहिती न मिळाल्याने थांबलेला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या मतदार नोंदणीचे सत्य अद्याप उजेडात आलेले नाही.
गुन्हा दाखल, पण तपास ठप्प
याप्रकरणी राजुरा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३(५), ३३६(१), ३३६(२), ३३७, ३४० (२), तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम १९५०, १९५१, १९८९ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तपासादरम्यान, संशयित मतदारांची नोंदणी ज्या संगणकांवरून झाली, त्या आयपी अॅड्रेसची माहिती निवडणूक आयोगाकडे मागविण्यात आली होती. मात्र, आयोगाकडून आजतागायत कोणताही प्रतिसाद न आल्याने पुढील कारवाई ठप्प झाली आहे.
बोगस मतदार असल्याचा दावाराजुरा - ३१९५गडचांदूर - ११२२कोरपना शहर - ६२२नांदाफाटा - ३६२लखमापूर - ४०७बाखर्डी - ७९जिवती शहर - १३५मतदारसंघात इतर ठिकाणी - ९३१एकूण - ६८५३
अमिरिका राय: सदर व्यक्ती नांदा येथे राहत नसून पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक व पत्ता चुकीचा आहे तसेच फोटो अपलोड नसल्याने ओळखायचे कसे हा प्रश्न आहे.सत्यम अनिल साहू : ही व्यक्ती नांदा येथे राहत नसून पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक व पत्ता चुकीचा आहे तसेच फोटो अपलोड नसल्याने ओळखायचे कसे हा प्रश्न आहे.र्नजन राजेश: ही व्यक्ती गडचांदूर येथे राहत नसून पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक व पत्ता चुकीचा आहे तसेच फोटो अपलोड नाही.रोहित संजय कुमारः ही व्यक्त्ती नांदा येथे राहत नसून पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक व पत्ता चुकीचा आहे तसेच फोटो अपलोड नाही.