आवाळपूर : कोरपना तालुक्यातील श्रीमंत व सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणूून ओळख असलेल्या नांदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपाटले आहे. आपआपले उमेदवार मैदानात उतरविले असून या मैदानात काही दिग्गज नेतेही उतरले आहेत.१७ जागांसाठी ही निवडणूक होणार असून मनसे, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, युतीकडून ग्रामविकास आघाडी मैदानात उतरली आहे. तर काँग्रेस, भाजपा, शिवसेना स्वबळावर लढत आहे. भाजपा १६ जागेवर लढत आहे. ग्रामविकास आघाडी १७ जागेवर तर नव्यानेच स्वबळावर लढत असलेल्या शिवसेना नऊ जागेवर लढत आहे. त्याच बरोबर आपल्या बालेकिल्ल्यावर अस्तित्व टिकविण्यासाठी काँग्रेस १७ उमेदवार रिंगणात उतरविले आहे. यामध्ये खरी प्रतिष्ठेची लढाई वॉर्ड क्र. २, ४ व ६ मध्ये दिसून येत आहे. वॉर्ड क्र. २ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते माजी सरपंच श्यामसुंदर राऊत यांनी आपला मुलगा चंद्रशेखर राऊत यांना उमेदवारी देवून आपली प्रतिष्ठा कायम ठेवण्याचा चंग बांधला आहे. त्याच बरोबर रत्नाकर चटप यांनी स्वत: उमेदवारी स्वीकारुन शेतकरी संघटनेचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी धुरा स्वीकारली आहे. तर नव्यानेच राजकारणात सक्रिया झालेले भाजपचे प्रभाकर चटकी यांनी सुद्धा उमेदवारी स्वीकारली आहे. या अस्तित्वाच्या लढाईत कोण बाजी मारणार, हा प्रश्न मतदारासमोर कायम आहे. एकुणच ९ जुलैला मतदान होणार असून वातावरण तापले आहे. (वार्ताहर)
अस्तित्वाच्या लढाईत कोण मारणार बाजी
By admin | Updated: July 7, 2016 00:54 IST