नागभीड : ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत वनविभागाने देवपायली येथे गस्त लावली. पण या गस्त पथकाची नजर चुकवून बिबट्याने गावात प्रवेश केला आणि एकाची कोंबडी फस्त केल्याची घटना शुक्रवारच्या रात्री घडली.‘तो येतो, सावज टिपतो आणि निघून जातो’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने देवपायली वासीयांची व्यथा मांडली होती. या वृत्ताची दखल घेत वनविभागाने त्याच दिवशी देवपायली येथे गस्त लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एका पथकाची निर्मिती करण्यात आली. या पथकात एक वनपाल आणि चार वनरक्षकांचा समावेश आहे.शुक्रवारच्या रात्री हे गस्त पथक देवपायली येथे आले आणि गावात गस्त घालू लागले या पथकाची गस्त सुरु असतानाच या पथकाची नजर चुकवून बिबट्याने खुशाल नान्हे यांच्या घरी प्रवेश केला आणि कोंबळ्या ज्या ठिकाणी बेंडल्या होत्या त्या ठिकाणी गेला. यावेळी नान्हे यांना कोंबड्या ओरडण्याची आवाज आला. पण मांजर वगैरे असेल असे समजून प्रकाश नान्हे यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र कोंबड्या जास्तच ओरडू लागल्या म्हणून नान्हे झोपेतून उठले असता बिबट कोंबडीला घेवून जात होता, अशी माहिती प्रकाश नान्हे यांनी ‘लोकमत’ला दिली.यानंतर त्याचवेळी या प्रकाराची माहिती गावात गस्त घालत असलेल्या पथकाला देण्यात आली. बिबट ज्या दिशेने कोंबडी घेवून गेला त्या दिशेने हे पथक गेले. पण तोवर बराच उशिर झाला होता. गेल्या एक- दीड महिन्यापासून देवपायली येथे एका बिबट्याचा थरार सुरु आहे. तो रोज गावात येतो एक सावज टिपतो आणि निघून जातो, त्याच्या या कारवायांची देवपायलीकर चांगलेच त्रस्त आहेत. (तालुका प्रतिनिधी)गेल्या एक दीड महिन्यापासून आमच्या गावात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. लोकमतने यासंदर्भाने वृत्त दिल्यानंतर वनविभागाने गस्त लावली. यामुळे आम्ही लोकमतचे आभारी आहोत, अशा अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. गावात गस्त लावण्यापेक्षा पिंजरा लावून या बिबट्याला पकडावे आणि गावाला दहशतीमधून मुक्त करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
गस्त सुरु असतानाच बिबट्याची गावात हजेरी
By admin | Updated: February 9, 2016 00:48 IST