आवाळपूर : कोरपना तालुक्यात १७ ग्रामपंचायतमध्ये मतदार आपले मत नोंदवत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून व्हीलचेअर खरेदी केल्या आणि त्या ग्रामपंचायतीला पुरविण्यात आल्या. मात्र व्हीलचेअर गेल्या तरी कुठे, असा प्रश्न पडला असून वृध्दांना शुक्रवारी काठीचा आधार घ्यावा लागला.
मोजक्या काही ग्रामपंचायत सोडल्या तर बाकी इतर ग्रामपंचायतमध्ये तीच परिस्थिती दिसून येत होती. नागरिकांनी एकत्र येऊ नये व कोणतीही अनुचित घटना घडू नये या उद्देशाने पोलीस विभागाने तगडा बंदोबस्त ठेवून दुचाकी सुध्दा जाणार नाही अशी व्यवस्था केली होती. मात्र व्हीलचेअर नसल्याने वृध्दांची ऑटोरिक्षाने ने-आण सुरू होती. यामुळे बूथ केंद्रावर गर्दी दिसून येत होती.
मास्क व सॅनिटायझरचा वापर होताना दिसला.
बॉक्स
आशावर्करनी निभावली कोरोना योद्ध्याची भूमिका
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार आपले हक्क बजावत होते. दुसरीकडे गावात आशा वर्कर नागरिकांना मास्क लावा, सॅनिटायझर लावा, असे सांगताना दिसत होते. एवढेच नाही तर बूथ केंद्राच्या पुढे बसून मतदारांच्या हातावर सॅनिटायझर देताना निदर्शनास आल्या.