संभाजी ब्रिगेडचे पडोली तर आसनच्या शेतकऱ्यांचे गडचांदूर मार्गावर रास्ता रोकोचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज बुधवारी चंद्रपूर व आसन येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर एसीसी कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढीसाठी कामगारांनी मुंडण आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड चंद्रपूरच्यावतीने चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील पडोली चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील हजारो शेतकरी बैलबंडी घेऊन सहभागी झाले होते. संभाजी ब्रिगेडने १ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन, मंत्र्यांना घेराव, निवेदन इत्यादी माध्यमातून शेतपिकाला हमीभाव मिळावा यासाठी राज्यात आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. दुपारी १२.३० वाजता नागपूर- चंद्रपूर महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यामुळे काही काळ येथे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.कापूस पिकाला ७ हजार, धान पिकाला पाच हजार, सोयाबिनला पाच हजार प्रती क्विंटल हमीभाव देऊन शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, जलसिंचनाच्या सोयी व १२ तास वीज द्यावी आदी मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धरणाच्या पाण्यासाठी आसन येथील शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलनकोरपना : तालुक्यातील पकडीगुडम धरणाचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनानासाठी मिळावे, १३ गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा याकरीता आज गडचांदूर-कोरपना मुख्य मार्गावरील आसन फाट्यावर पकडीगुडम धरणातील बारा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे मुख्य मार्गवरील वाहतूक खोळंबली. यावेळी गडचांदूर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.कोरपना तालुक्यातील अमलनाला व पकडीगुड्डम मोठ्या धरणाची निर्मिती शेतकऱ्यांच्या हितासाठी झाली. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अजूनही पाणी पोहचलेले नाही. परंतु, तालुक्यातील सिमेंट उद्योगाला या दोन्ही धरणाचे पाणी दिले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेकांची शेती कोरडवाहू आहे. कंपन्यांशी केलेला करार संपुष्टात आणावा, पकडीगुड्डम धरणाचे पाणी २६८० हेक्टर शेतजमीनीच्या सिंचनाकरिता उपलब्ध करुन द्यावे, १३ गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी द्यावे, रबी पिकांसाठी धरणाचे पाणी तातडीने सोडण्यात यावे आदी मागण्या रास्ता रोको आंदोलनातून करण्यात आले. शेतकऱ्यांना धरणाचे पाणी न दिल्यास आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मत सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आस्वले, मडावी, ईश्वर पडवे, देवराव चांदेकर, मधू करघागे, बंडू देवालकर, हिरालाल पडवे, संतोष टोंगे, शंकर निमकर, मंगेश भोयर, माजी सरपंच भोंगळे यांनी दिला. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (लोकमत चमू)
बुधवार ठरला आंदोलन ‘वार’
By admin | Updated: December 3, 2014 22:46 IST