अतिक्रमणाने नागभीडचे रस्ते गिळंकृत होण्याच्या मार्गावर
By admin | Published: December 7, 2015 05:13 AM2015-12-07T05:13:46+5:302015-12-07T05:13:46+5:30
नागभीडच्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण आणि सर्रास होत असलेली जडवाहतूक यामुळे
घनश्याम नवघडे ल्ल नागभीड
नागभीडच्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण आणि सर्रास होत असलेली जडवाहतूक यामुळे नागभीडरांना रस्त्यांनी चालणेही कठीण झाले आहे. या गंभीर समस्येकडे येथील ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
नागभीड हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तालुक्यातून दररोज हजारो नागरिक विविध कामासाठी नागभीडला येत असतात व विविध प्रकारची खरेदी करत असतात. पण या हजारो नागरिकांना आणि नागभीडकरांना सावावून घेण्याची क्षमताच येथील रस्ते हरवून बसले आहेत, असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
येथील जनता शाळेपासून टॉकीज चौकापर्यंत असलेला रस्ता ठिक आहे. पण टॉकीज चौकापासून तर भगतसिंग चौकापर्यंत नेहमीच वर्दळ असलेला हा रस्ता कृत्रिम अतिक्रमणाने पार गिळून टाकला आहे. या रस्त्यावर असलेल्या विविध प्रतिष्ठानाच्या मालकांनी आपल्या दुकानांसमोर नाल्यांवर छत टाकून सामानासाठी अतिक्रमण केले आहे. त्यातच सामान खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यांवर उभी करीत असल्याने चार चाकी वाहनांना मार्गक्रमण करण्यासाठी जागाच उरत नाही. भरीस भर म्हणजे याच रस्त्याने नागभीड येथील मोठ्या व्यापाऱ्यांच्या मार्ग काढण्यासाठी १५ ते २० मिनीट कसरत करावी लागते. अशावेळी अनेकदा तर अपघाताची शक्यताही निर्माण होत असते.
विठ्ठल मंदिराकडून बाजार चौकात जाणाऱ्या रस्त्याचीही स्थिती याहून वेगळी नाही. लोक सांगतात पूर्वी या रस्त्याने मोठी वाहने चालायची. आता येथून छोटी कारसुद्धा चालत नाही. संपूर्ण रस्ताच गिळंकृत झाला आहे. नागभीडचा आणखी एक रहदारीचा रस्ता म्हणजे गोरोबा चौकातून राममंदिर चौकात निघणारा रस्ता आणि जुन्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून राममंदिर चौकात निघणारा रस्तासुद्धा अतिशय महत्वाचा आहे. या दोन्ही रस्त्यांना चांगलीच रहदारी असते. पण हे दोन्ही रस्ते एवढे अरुंद झाले ओहत की, मिनिडोअरसारखी दोन वाहने परस्परांसमोर आली तर त्यांना वाट काढणे कठीण होऊन जाते. अशावेळी साधे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नाहक ताटकळत राहावे लागते.
ही केवळ वाणगीदाखल उदाहरणे झाली. नागभीडच्या बहुतेक प्रत्येक रस्त्यांची स्थिती याहून वेगळी नाही. आणि म्हणूनच नागभीडच्या ग्रामपंचायतीने या रस्त्यांबाबत मनन आणि चिंतन करणे गरजेचे आहे.
हे अतिक्रमण आजचे नाही. अनेक वर्षापासूनचे आहे. आम्ही नवीन आहोत, तरीपण सर्व सदस्यांना विचारात घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल.
- विनय शेंडे, सरपंच, ग्रा.पं. नागभीड
नागभीडच्या प्रमुख रस्त्यांवर वाढत चाललेले अतिक्रमण ही खरोखरच चिंतेची बाब आहे. ग्रामपंचायतीने कार्यदेशीर प्रक्रिया पार पाडून हे अतिक्रमण हटविण्यास काहीच हरकत नाही, आमचे सहकार्य असेल.
- विजय अमृतकर, गटनेता काँग्रेस पक्ष व सदस्य ग्रा.पं. नागभीड