घोसरी : चेक ठाणेवासना येथील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने लाखो रुपये खर्चून जल स्वराज्य प्रकल्प १५ वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते. परंतु निकृष्ट बांधकामामुळे टाकीमध्ये पाणी संचय होत नसल्याने येथील जनतेला शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत चेकठाणेवासना येथे १५ वर्षांपूर्वी जल स्वराज्य प्रकल्प कार्यान्वित करण्यात आली होती. याकरिता ३७ लाख खर्ची करण्यात येऊन १० टक्के लोकसहभागाचा समावेश होता.
सदर प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असल्याने टाकीत साठविण्यात आलेल्या पाण्याची गळती होऊन टाकी रिकामी होत असते. परिणामी लाखो रुपये खर्चूनसुध्दा येथील जनतेला शुद्ध पाण्यापासून वंचित राहून अन्य स्तोत्रातील पाण्यावर तृष्णा भागविण्याची नामुष्की जनतेवर ओढवली आहे.
तद्वतच नदीवरील पंप हाऊस व तेथील मोटारसुध्दा शोभेची ठरली आहे. सदर प्रकल्पाच्या कामात गैरप्रकार झाला असल्याने याबाबत सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य वैभव पिंपळशेंडे व गावकऱ्यांनी केलेली आहे.