लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या अनुषंगाने जलजीवन मिशन अंतर्गत कालबद्ध कार्यक्रम आखून अस्तित्वात असलेल्या नळ योजनांचे पुनर्जीवन करणे व नवीन नळ योजनांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. सदर योजनेचा आराखडा तयार करताना गावातील प्रत्येक व्यक्तीला प्रति दिवस ५५ लिटर पाणी पुरविण्याचे नियोजन ठेवून ९९ योजनांचे आराखडे तयार करण्यात आले आहे. यात २३ गावात सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये एकूण ९९ योजनांचा आराखडा तयार करून गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरापर्यंत पाणी पोहचविण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले. सद्यस्थितीत ९९ पैकी ५५ योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण करण्यात आली असून, ४४ योजनांची नळ जोडणीची कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे एकूण आराखड्यापैकी २३ योजना सौर ऊर्जेवर आधारित तयार करण्यात आल्या असून, विद्युत बिलाच्या तणावामधून ग्रामस्थांना कायम मुक्त करण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने ग्रामीण पाणीपुरवठा शाखा अभियंता साहेबलाल मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर योजनांचा आराखडा तयार करण्यापासून ते कार्यान्वित करण्यापर्यंतची सर्वच इत्तंभूत माहिती दिली.
वरिष्ठांचे होतेय मार्गदर्शनसदर योजनांची कामे करताना येणाऱ्या प्रशासकीय तांत्रिक अडचणी, तसेच स्थानिक अडचणी आल्या, त्या मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात सोडवून यशस्वी करण्यात आल्याचे व उर्वरित योजनांची कामे प्रगतीपथावर असल्याचे शाखा अभियंता साहेबलाल मेश्राम यांनी सांगितले.
९१ योजनांचेआराखडे तयार करण्यात आले असून, लवकरच या योजना नागरिकांसाठी कार्यान्वित केल्या जाणार आहेत.
१५ योजनांचा पाणीपुरवठा अविरत सुरू१५ योजनांचा पाणीपुरवठा अविरत सुरू आहे. या यशस्वी योजनांपैकी गायडोंगरी, परसोडी (झिलबोडी) व माहेर या तिन्ही योजनांचा पाणीपुरवठा सौर पंपाद्वारे होत असल्याने, ग्रामस्थांना पाणीपट्टीच्या करापासून कायम मुक्तता झाली. या तिन्ही योजनांद्वारे सर्व कुटुंबांना आवश्यक व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत असून, शाळा, अंगणवाडी व गुरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. योजनांच्या यशस्वी कार्यान्वयाबाबत सरपंच सचिव व ग्रामस्थांनी आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.
"गायडोंगरी, परसोडी, माहेर यासारख्या २३ गावांतील नळयोजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात आल्या असून, याठिकाणी विद्युतची गरज नसल्याने विद्युत बिलापासून मुक्तता झाली आहे."- साहेबलाल मेश्राम, शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग ब्रम्हपुरी.