ब्रह्मपुरी : एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अवैध वाळू उत्खनाला पायबंद घालण्यासाठी गुन्हे दाखल करण्याची सुचना केली जाते तर दुसरीकडे तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून वाळू माफियांशी असलेल्या संगनमताने वैनगंगा नदीपात्रातून अवैध उत्खनन होत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यंदा फेब्रुवारी महिण्यातच तालुक्यातील अनेक पाण्याचे स्त्रोत आटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता अवैध वाळू उपशावर ताबडतोब पायबंद लावण्याची मागणी केली जात आहे. वाळू उपशासाठी वैनगंगा नदीवर असलेल्या काही घाटांचा समावेश आहे. या तिन्ही घाटातून कोट्यवधींचा महसूल शासनाला मिळणे अपेक्षित होता. परंतु तालुक्यातील अनेक घाटांचा लिलाव न झाल्याने तो मिळाला नाही. परिणामी तस्करांकडून वाळूचे अवैध उत्खनन जोमात सुरू झाले आहे. वाळूचे अवैध उत्खनन थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दुसरीकडे नदीपात्रात अवैध वाळूचे उत्खनन सर्रासपणे सुरू आहे. नदीपात्रात जागोजागी मोठमोठे खड्डे तयार करण्यात आले आहेत. अनेक नदीकाठच्या गावातून रेतीचे रात्री-बेरात्री ने-आण सुरू आहे. हा प्रकार एखाद्याने निदर्शनास आणून दिल्यानंतरही अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष होते. परिणामी नदीकाठावरील विहिरींच्या पाण्याची पातळी भविष्यात खालावण्याची शक्यता असून प्रशासनाने वाळू उपसा बंद करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)पैसे घेऊन सोडले जाते वाहनवैनगंगा वाळू उत्खननात टॉप टू बॉटम वाहनाला पकडण्याचे कार्य करतात परंतु पैसे घेवून वाहन सोडल्या जात असल्याने उत्खनन करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा महसुलाला प्रशासन मुकत आहे. यातून तक्रारकर्त्यांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एका वाहनावर कारवाईदरम्यान, वाढत्या तक्रारी लक्षात घेता येथील महसूल विभागाने वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई केली. ही मोहिम अशीच कायम ठेवल्यास वाळूचा उपसा कमी होईल. त्यामुळे महसूल विभागाने वाळू तस्करी थांबविण्यासाठी विशेष मोहिम सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
अवैध वाळू उपस्यामुळे पाणी टंचाईचे संकट
By admin | Updated: February 3, 2016 01:05 IST