बी.यू.बोर्डेवार - राजुराराजुरा तालुक्यातून वर्धा नदी वाहते. या तालुक्यात डोंगरगाव आणि भेंडाळा हे दोन मोठे सिंचन प्रकल्प असूनही राजुरा तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईशी झुंजावे लागत आहे. राजुरा तालुक्यातील भुगर्भात मुबलक पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. राजुरा तालुक्यातील डोंगरगाव सिंचन प्रकल्पावर करोडो रुपये खर्च झाला. मागील १५ वर्षांपासून या प्रकल्पाच्या कालव्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या पाटापर्यंत अजुनही पाणी पोहचले नाही. भेंडाळा प्रकल्पाचे पाणीसुद्धा नागरिकांना मुबलक प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे राजुरा तालुक्यातील नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. राजुरा तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करण्यात आले. परंतु निकृष्ट बांधकामामुळे गावातील नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. अनेक गावातील बोअरिंग बंद असून लक्कडकोट, सिंधी, नदी पट्टयातील चार्ली, निर्लर्ीेसारख्या गावात पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. राजुरा तालुक्यातील वेकोलि व कोलवाशरीज्मध्ये मोठय़ा प्रमाणात भूगर्भातील पाणी उपसा करण्यात येत असून या कंपन्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. सोन्डो परिसरात बोअरिंग मारले तरी पाणी लागत नसून शेतकर्यांपुढे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.राजुरा शहरातील निजामकालीन तलावाचे खोलीकरण करण्यात येत असल्यामुळे शहरातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. या तलावाच्या संवर्धनासाठी आठ करोड रुपये खर्च करण्यात येत असून राजुरा तालुक्यातील मूर्ती कोलाम गुड्यामध्येसुद्धा नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. राजुरा तालुक्यातील नदी, नाले पूर्णत: आटले असून माणसाबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा बिकट झाला आहे.राजुरा तालुक्यात पाणी टंचाईवर मात करता यावी, यासाठी उन्हाळ्यापूर्वीच राजुराचे आ. सुभाष धोटे यांनी संबंधित अधिकार्यांशी पाणी टंचाईवर सविस्तर चर्चा करून राजुरा तालुक्यासह राजुरा विधानसभा क्षेत्रात पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकार्याना निर्देश देण्यात आले. राजुरा विधानसभा क्षेत्रात पाण्यासाठी आदिवासीबहुल क्षेत्रातील नागरिकांना पायपीट करावी लागत असून अनेक गावातील विहिरीचे पाणीसुद्धा आटत चालले आहे. या सर्व परिस्थितीमुळे अनेक गावांतील महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा पारा ४६ अंशावर पोहोचला आहे. या तीव्र उन्हात या भागातील नागरिकांचे पाण्यासाठी अक्षरश: हाल सुरू आहेत. पाण्यासाठी भविष्यात कसे नियोजन करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
राजुरा तालुक्यात पाण्यासाठी भटकंती
By admin | Updated: May 31, 2014 23:22 IST