चंद्रपूर मनपा : वॉर्ड विभागणीवर अनेकांची नाराजी चंद्रपूर : येत्या एप्रिल २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षणाचा आणि वॉर्डांच्या फेररचनेचा अनेकांना फटका बसला आहे. फेररचनेत अनेक वॉर्ड विस्कटले आहेत, तर काही प्रभागांचे अस्तीत्वच संपुष्टात आले आहे. त्यामुळे या फेरचनेवर आक्षेप नोंदविण्याची तयारी काही नगरसेवकांनी चालविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत साफल्य भवनात शुक्रवारी दुपारी १२ वाजता वॉर्ड फेररचना जाहीर करून त्यानंतर ६६ वार्डांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांसह नगरसेवक आणि निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या अनेकांनी या सोडतीच्या वेळी गर्दी केली होते. ६६ नगरसेवकांच्या जागांसाठी येत्या एप्रिल महिन्यात चंद्रपूर महानगर पालिकेमध्ये निवडणूक होत आहे. यासाठी आखण्यात आलेल्या नव्या आरक्षणामध्ये एकूण १७ प्रभाग पाडण्यात आले आहेत. चार सदस्य असणारे १५ व तीन सदस्य असणारे दोन असे १७ प्रभाग राहणार आहेत. अनुसूचित जातीकरिता १३ राखीव जागा असून अनुसूचित जमातीकरिता पाच जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १८ जागा असून महिलांसाठी ५० टक्के म्हणजे ३३ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. १६ जागा अराखीव असून या ठिकाणातील लढती स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणार आहे. महिलांना मिळालेल्या ३३ जागांच्या आरक्षणात अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ७, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग असलेल्या महिलांसाठी ९ तर सर्वसाधारण प्रवर्गातील स्त्रीयांसाठी १४ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. नव्या प्रभाग रचनेत झालेल्या बदलामुळे काही सुखावले तर काही दुखावले आहेत. तूकूम, वडगावच्या तुलनेत सिव्हील लाईन्स व अन्य ठिकाणी झालेला बदल नव्या उमेदवारांसाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. वॉर्डांची विभागाणी मुख्य रस्त्याने न होता अंतर्गत रस्त्यांच्या सिमारेषा ठरविण्यात आला आहेत. त्यामुळे मतदारांशी संपर्क साधताना अडचणीचे ठरणार आहे. ज्या नगरसेवकांनी पुढील निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वॉर्डात विकासकामे केली, त्यांना नव्या रचनेमुळे जबरदस्त धक्का बसला आहे. वॉर्डात नव्यानेच समाविष्ठ मतदारांशी संपर्क व नव्या भागातील समस्या समजून घ्याव्या लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) लोकसंख्यानिहाय आकडेवारीचे गणित मतदान आणि मतदार या संबंधात राजकारणामध्ये आकडेवारी महत्वाची मानली जाते. चंद्रपूर महानगर पालिकेत ३ लाख २० हजार ३७९ लोकसंख्या असून अनुसूचित जातीची लोकसंख्या ६१ हजार १६४ आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या २५ हजार ७९४ आहे. तीन सदस्य निवडून दञयावयाच्या प्रभागात १३ ते १६ हजार लोकसंख्या विभागण्यात आली आहे. तर, चार सदस्य निवडून द्यावयाच्या प्रभागात १७ ते २१ हजार लोकसंख्या राहणार आहे. त्यामुळे भविष्यात रिंगणात उतरणारे उमेदवार, त्यांच्यात होणारी मतविभागणी कशी असेल याचे आराखडे बांधणे आतापासून सुरू झाले आहे. सिव्हल लाईन्स प्रभाग नामशेष स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तीत्वात असलेला सिव्हील लाईन्स हा प्रभाग या वेळी पहिल्यांदाच नामशेष झाला आहे. या भागात असलेल्या इंग्रजकालीन इमारती, कार्यालये, अधिकाऱ्यांचे बंगले यामुळे या परिसराची सिव्हील लाईन्स अशी ओळख होती. मात्र नव्या प्रभाग रचनेत या प्रभागाचे तुकडे पाडून नगीनाबाग, वडगाव आणि तुकूम या प्रभागात विलीन करण्यात आला आहे.
वॉर्ड फेररचना आणि प्रभाग आरक्षणाचा अनेकांना फटका
By admin | Updated: December 23, 2016 00:42 IST